जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट
गुहागर : तालुक्यातील पाचेरी आगर गावात अतिसार संसर्गाचे रुग्ण सापडल्याने परिसरासह आरोग्य यंत्रात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा वैद्यकीय अधिकारी बबिता कमलापुरकर यांनी तातडीने पाचेरी अगर गावाला भेट देऊन आरोग्य यंत्रणेला दक्षतेच्या सूचना केल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अतिसारच्या साथीने पाचेरी आगर गावात ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
गुहागर तालुक्यातील पाचेरीआगर गावात अचानकपणे अतिसार संसर्ग झालेले रुग्ण सापडून येताच कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जांगिड यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ही साथ नियंत्रणात आणली आहे. या साथीचे कारण समजले नसले तरी काही गोष्टी तपासणीसाठी रत्नागिरी येथील लॅब मध्ये पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार या संसर्गाची सुरुवात रविवार पासून झाली असावी. सोमवारी कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहमी प्रमाणे रुग्णांना तपासत असताना पाचेरी अगर गावातून एकत्रित आलेल्या काही रुग्णाची तब्येत खालावलेली व कमी रक्तदाबाची जाणवली. त्यानंतर लगेचच पाचेरी आगर गावात आरोग्य पथकाने जाऊन पाहणी केली असता, भुवडवाडी, हुमणेवाडी, गुरववाडीमध्ये अतिसातीचे २६ रुग्ण आढळले. या रुग्णांवर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत. सर्व रुग्णांना गावातील एकाच अंगणवाडीत उपचार करण्यात येत आहेत. त्यासाठी पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर यांनी सहकार्य केले आहे.
दरम्यान, हा प्रकार जिल्हा आरोग्य अधिकारी कमलापुरकर यांना कळताच त्यांनी मंगळवारी सकाळी पाचेरी आगर गावाला भेट दिली. रुग्णांवर योग्य वेळी उपचार झाल्यामुळे ही साथ आटोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तरी याकडे दुर्लक्ष न करता गांभीर्याने व योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळावी, अशा सूचना आरोग्य यंत्रणेला केल्या आहेत. उपसरपंच दीपक भुवड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसेवक श्री. सुपेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा व ग्रामस्थ यांनी आरोग्य यंत्रणेला चांगले सहकार्य केले आहे. भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, माजी पंचायत समिती सदस्य विजय भुवड यांनी गावाला तात्काळ भेट देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून परिस्थिती जाणून घेतली व आवश्यक त्या ठिकाणी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.