गुहागर, ता. 23 : यांत्रिक नौकेला बांधलेल्या पगाराची दोरी तुटल्याने पगार समुद्रात हेलकावे खाऊन भरकटला. (Accident of little boat) त्यावेळी पगारावर कोणताही खलाशी नव्हता. समुद्रात भरकटेला पगार खलाशांनी पुन्हा बांधून पालशेत बंदरात आणला. या घटनेची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात झाली आहे.
पगार म्हणजे यांत्रिक नौकेला बांधलेली छोटी होडी. अनेकवेळा यांत्रिक नौका किरकोळ कामांसाठी बंदरात आणणे शक्य नसते. किंवा समुद्रात जाळे पसरण्यासाठीही बिगर यांत्रिक छोट्या होडीचा वापर केला जातो. अनेक यांत्रिकी नौका आपल्यासोबत अशी बिगर यांत्रिक छोटी होडी घेवून समुद्रात जातात. असगोलीतील मच्छीमार जुलेश पालशेतकर आज पहाटे मासेमारीसाठी यांत्रिक नौका घेवून समुद्रात गेले. या नौकाला बांधलेला पगार होता. पालशेत परिसरात समुद्रात मासेमारी करत असताना या नौकाला बांधलेला पगाराचा दोर तुटला. (Accident of little boat) वेगवान वाऱ्यामुळे तुटलेला पगार भरकटला आणि असगोली पालशेत दरम्यानच्या खडकाळ भागात केला. जुलेश पालशेतकर यांच्यासह समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौकांवरील खलाश्यांनी हा खडपातील पगार काढून पालशेत बंदरात आणला. त्यानंतर सर्व मच्छीमार नौका पुन्हा मासेमारीसाठी निघुन गेल्या. ही घटना घडली तेव्हा पगारावर कोणीही खलाशी नव्हता.
दरम्यान रविवारी सकाळी समुद्रात वेगवान वारे वाहू लागल्याने खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या अनेक मच्छीमारांना परतावे लागले. वाऱ्यामुळे लाटांची उंची वाढत होती. आणखी धोका वाढल्यास अनर्थ घडु शकतो म्हणून मच्छीमारांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक मच्छीमार नौकांनी सुरक्षित बंदर गाठले.