गुहागर नगरपंचायत अंतर्गत नव्या रस्त्यावरील घटना
गुहागर, ता. 02 : शहरातील कुलस्वामिनी चौक ते किर्तनवाडी रस्त्यावर आज एक जीप रस्त्यासोडून गटारात गेली. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र नव्याने केलेल्या रस्त्याला संरक्षक कठडा नसल्याने हा अपघात झाला. यापूर्वीच यासंदर्भात अभियंत्यांना सूचना केल्या होत्या. असे बांधकाम सभापती सौ. वैशाली मालप यांनी सांगितले आहे.
किर्तनवाडी रस्त्याला रहाणारे महेंद्र आरेकर आपल्या मालकीची जीप घेवून चालले होते. चढामध्ये असताना काही कारणांमुळे त्यांना जीप मागे घ्यावी लागली. यावेळी नव्याने झालेल्या रस्त्याला संरक्षक कठडा नसल्याने जीप थेट गटारात गेली. सुदैवाने जीपमध्ये असलेल्या महेंद्र आरेकर आणि त्यांचा सहकारी यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
मात्र नवनिर्वाचित बांधकाम सभापती सौ. वैशाली मालप यांच्या कारकिर्दीतील पहिल्याच रस्त्यावर अपघात झाल्याने त्या अस्वस्थ झाल्या. या रस्त्याला संरक्षक कठडा हवा असा आग्रह आम्ही अभियंत्याकडे ८ दिवसांपूर्वीच केला होता. रस्त्याचे काम सुरु असताना अभियंत्यांनी थोडी दूरदृष्टी दाखवून ठेकेदाराकडून हे काम करुन घेतले असते तर आजचा अपघात टळला असता. अशी प्रतिक्रिया सौ. वैशाली मालप यांनी दिली.
तर नगराध्यक्ष राजेश बेंडल म्हणाले की, येथील रस्ता पूर्वीपासूनच धोकादायक असल्याने दुरुस्तीचे काम नगरपंचायतीने तातडीने हाती घेतले. सद्यस्थितीत तेथे काम सुरु आहे. आम्ही एकत्रित पहाणी केली तेव्हा संरक्षक बांध आवश्यक असल्याचे निदर्शनास आले होते. तशा सूचना आम्ही अभियंत्यांना केल्या आहेत.