नैतिक जबाबदारी स्विकारून मंत्रीपदाचा राजीनामा द्या – बाळ माने
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आजही थैमान घातलेलं आहे. जिल्ह्यात सतराशे पेक्षा जास्त व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहेत. हे अपयश प्रशासनाचं नसून रत्नागिरीचे आमदार, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचं असून अत्यंत बेजबाबदारपणे त्यांनी केलेल्या कामाचं फळ आपल्या सर्वांना भोगावं लागत आहे. आरोग्य व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. त्यामुळे एक नैतिक जबाबदारी स्विकारून उदय सामंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी माजी आमदार बाळ माने यांनी केली आहे.
यावेळी श्री. माने म्हणाले की, कोरोनाने संपूर्ण जगाला त्रासलेलंं आहे. कोरोना मुक्तीकडे कशा पद्धतीने वाटचाल करता येईल यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात लस निर्मितीसाठी यश मिळवलं. 130 कोटींच्या आपल्या देशात पहिला डोस साधारणतः 25 कोटी जनतेला देण्यात आला आहे.
आज देशात, राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसतेय, मात्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे झोन चार किंवा पाच मध्ये दिसताहेत. म्हणजे कोरोनाचं संक्रमण फार मोठया प्रमाणात आहे. आज जिल्ह्यात कोरोनामुळे सतराशे रुग्ण दगावणे याचा अर्थ इथल्या सत्ताधारी पक्षाचं किंवा राज्यातल्या सदर पक्षाच्या नियोजनातलं हे अपयश आहे. आपण पहिल्या लाटेमधील आणि दुसऱ्या लाटेमधील जर नियोजन पाहिलं, तर पहिल्या लाटेमध्ये खूप चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आलं होतं. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजना चांगल्या प्रकारे राबविली. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात टेस्टिंग आणि ट्रेसिंग चांगल्या प्रकारे करण्यात आलं होतं. यावर्षी साधारणतः एप्रिल महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात एक सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी सुद्धा मी सांगितलं होतं की, आपली आरोग्य व्यवस्था शासकीय असो वा खासगी ही अपुरी आहे. आपल्याकडे बेड, ऑक्सिजन उपलब्ध नाहीत. पँरामेडीकल स्टाफ, डॉक्टर्स हे तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करून हे कोरोनाचे संक्रमण कसं थांबविता येईल, यासाठी धोरण केलं पाहिजे होतं, पण तसं झालं नाही, असं माने यावेळी म्हणाले.
खरंतर राजा बोले दल हाले असं आपण म्हणतो. त्यामुळे राज्यकर्ते जसं सांगतील तसं प्रशासन वागतं, किंवा केंद्र सरकारच्या गाईडलाईन्सनुसार आपण जर वागलो असतो तर कदाचित रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आला असता, मात्र आजही परिस्थिती अतिशय गंभीर आहे. लॉकडाऊन हा त्यावरचा उपाय होत नाही. आज चुकीच्या नियोजनामुळे व्यापारी त्रस्त आहेत, मध्यमवर्गीय त्रस्त आहेत, नोकरदार त्रस्त आहेत. हे पूर्णपणे अपयश रत्नागिरीचे आमदार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचं आहे, हे प्रशासनाचं अपयश नाही. कारण ते आज मंत्री आहेत, ते धोरण ठरवतात आणि त्याची अंमलबजावणी प्रशासन करतं. आज ते सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेत, रत्नागिरीचे पालकमंत्री ते नसले तरी पालकमंत्र्यांच्या थाटामध्ये ते वागताहेत. आणि रत्नागिरीच्या प्रशासनाला पालकमंत्री अनिल परब यांच्या ऐवजी हे सूचना देतात आणि प्रशासन काम करत आहे. मात्र जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पूर्णपणे त्यांना अपयश आलेलं आहे, जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आलेला नाही. मला यामध्ये राजकारण करायचं नाही. परंतु सर्व समाज, सगळी व्यवस्था, व्यापारी वर्ग, सामान्य नागरिक पूर्णपणे विषण्ण झालेला आहे. आज देशात, राज्यात कोरोना कमी होतोय, पण दुर्दैवाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना कमी होत नाहीय, हे चुकीच्या नियोजनामुळे झालेलं आहे. योग्य निर्णय वेळीच घेण्यात आले नाहीत, सारखे बदलण्यात आलेले निर्णय, टेस्टिंग-ट्रेसिंग योग्य पद्धतीने झालं नाही. होम क्वारंटाईन हे एक रुग्ण वाढीस कारणीभूत ठरलं. ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे, आरोग्य व्यवस्थेचं देखील हे अपयश आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा याच्यावर उपाय होऊ शकत नाही. रोगापेक्षा इलाज भयंकर झालेला आहे. उदय सामंत यांना पंढरपूर निवडणुकीच्या वेळी पंढरपूरची वारी करू नका असं मी म्हटलं होतं. हे लोक आपले आहेत, इथली जनता आपली आहे. या रत्नागिरीकरांनी तुम्हाला चार वेळा निवडून दिलं आहे. तुम्ही जबाबदारपणे वागलं पाहिजे. हे सातत्याने मतदारसंघात, रत्नागिरी जिल्ह्यात नसतात. मुंबईत असतात, मुंबईत आहे काय? व्हर्च्युअलरित्या काम करता आलं असतं, पण याकरिता आपण ठाण मांडून बसायला पाहिजे होतं, ते केलेलं नाही. पूर्णपणे उदासीनता त्यांच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये आहे. अत्यंत बेजबाबदारपणे त्यांनी केलेल्या कामाचं फळ आपल्या सर्वांना भोगावं लागत आहे. आरोग्य व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. त्यामुळे एक नैतिकता म्हणून जबाबदारी म्हणून उदय सामंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी आपली मागणी असल्याचं बाळ माने यावेळी म्हणाले. हे खापर प्रशासनावर फोडून उपयोग नाही, प्रशासन हे हुकमाचे ताबेदार असतात. जर प्रशासनाकडे व्यवस्थाच नसेल तर प्रशासन काय करणार असं माने यावेळी म्हणाले.