![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2020/10/त्वं-हि-दुर्गा.png)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2020/10/त्वं-हि-दुर्गा.png)
निसर्गरम्य परिसर आणि निरव शांततेत वसलेले ग्रामदेवता श्री नवलाई देवीचे मंदिर म्हणजे समस्त आबलोलीवासियांचे श्रध्दास्थान. उंचावर असलेल्या मंदिरात जाण्यासाठी चिरेबंदी पाखाडी बांधण्यात आली आहे. मंदिराचा काही वर्षांपूर्वी जीर्णोध्दार करण्यात आला आहे. शिमगोत्सवांतील श्रध्देचा परमोच्च क्षण पालखी भेटीचा सोहळा. या सोहळा पहाण्यासाठी संपूर्ण गाव गर्दी करते.
प्रवेशव्दारासमोर पूर्वांपार असेलेला नंदी हे या मंदिराचे वैशिष्ट्य. (साधारणपणे अन्य कोणत्याही ग्रामदेवतेच्या मंदिर समोर देवतेच्या वाहनाची प्रतिष्ठापना नसते.) मंदिरात प्रवेश केल्यावर या ठिकाणची शांतता मनोवेधक ठरते. मंदिरामध्ये ग्रामदेवता श्री नवलाई, श्री केदार, श्री वरदान देवी, श्री चंडीका देवी, श्री कालिका देवी, श्री सालबाई देवी, श्री मानाई देवी या सप्तदेवता स्थानापन्न आहेत. ग्रामदेवतेला देवदिवाळी, रक्षाबंधन (पोते), जागर, गोंधळ यावेळी रुपे लावून सजविले जाते तर शिमगोत्सवात या सर्व देवतांची पालखी भक्तांच्या भेटीसाठी गावात फिरते.
फाल्गुन शुध्द पंचमीला पहिली होळी पेटवून गावात शिमगोत्सवाला सुरुवात होते. गोडे सणाच्या दिवशी पालखी मंदिरातून बाहेर पडते. फाल्गुन कृ. प्रतिपदेला म्हणजे फाल्गुन पौर्णिमेच्या सकाळी सुर्योदयाबरोबर (भ्रदेचे होम) येथे होम पेटवला जातो. दुपारनंतर आबलोली सहाणेवर (होमाचे मैदान) येथे मोठी जत्रा भरते. येथील शिमगोत्सवाचे आणखी एक वेगळेपण म्हणजे सहाणेवर ग्रामदेवतेच्या पालखीसमोर गावातील मानकरी गावकरी धारदार शस्त्राचे घाव आपल्या अंगावर मारून घेतात यालाच हाणून घेणे असे म्हटले जाते. यासाठी देवाचे उपवास आणि अढळ श्रध्दा महत्त्वाची ठरते. यावेळी या शस्त्रांव्दारे कोणतीही इजा व्यक्तिला होत नाही हे पण एक नवलच आहे. याच दिवशी देवीचे विडे भरले जातात.
दुपारनंतर खोडदे येथील सहाणवाडी, देऊळवाडी ग्रामदेवता नवलाईच्या दोन पालख्या आबलोलीची ग्रामदेवता नवलाईला भेटण्यासाठी येतात. खोडदेच्या दोनही पालख्या क्रमाक्रमाने आबलोली ग्रामदेवतेला भेटतात. या देवतांमध्ये आबलोली-खोडदे बहिणींचं नातं असल्याचे ग्रामस्थ सांगतात. दोन्ही गावातील लोक आपल्या खांद्यावर पालखी नाचविणाऱ्या भक्ताला उचलून घेतात. आणि भक्तांच्या खांद्यावरली पालख्या वाजत-गाजत, सूरसनईच्या नादात गळाभेट करतात. याचवेळी दोन्ही बाजूचे ग्रामस्थही एकमेकांची गळाभेट घेतात. या दोन बहिणींची भेट होताना पालखीतील नारळांची अदलाबदल होते अशी आख्यायिका सांगितली जाते. आबलोली-खोडदे पालखीभेट होत असताना खोडदे येथील दुसरी पालखी एका बाजूस ग्रामस्थ नाचवित असतात. पहिली पालखी भेटून निघून गेल्यावर दुसरी पालखी आबलोली ग्रामदेवतेला भेटते. आबलोली येथे रंगणारा हा पालखी सोहळा हजारो भक्तगण याचि देही याचि डोळा अनुभवतात आणि ग्रामदेवता नवलाई प्रति श्रध्देने लीन होतात.
शिमगोत्सवात नवलाई भक्तांचा आनंद ओसंडून वाहत असतो. वर्षभर वाट पाहिल्यानंतर देवीची पालखी गावभेटीसाठी बाहेर पडते. देवीच्या स्वागतासाठी घरोघरी सडासंमार्जन, रांगोळ्या, गोड-धोड पदार्थ, विद्युत रोषणाई केली जाते. गावात प्रत्येक घरातील यजमानाला आपल्या घरी ग्रामदेवतेची पूजा करण्याचे सद्भाग्य लाभते. ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. गावात सुमारे 20-21 दिवसांत पालखी प्रदक्षिणा पूर्ण केली जाते. पालखी देवळात जाताना संपूर्ण गाव मिरवणुकीत सहभागी होतो. सर्वांना भंडारा (प्रसाद) वाटला जातो.
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2020/10/Abloli-Gramdevata-1024x1024.jpeg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2020/10/Abloli-Gramdevata-1024x1024.jpeg)
ग्रामदेवतेच्या मंदिरात शिमगोत्सवाबरोबरच अनेक उत्सव वर्षभर साजरे केले जातात. देवदिवळीला सर्व ग्रामस्थ मंदिरात जमतात. रुपे लावली जातात. देवाला दिवा ओवाळला जातो. त्यानंतर मानकरी आणि पाहुण्यांचा दिवा ओवाळून मान दिला जातो. देवीचा गोंधळ प्रतिवर्षी घातला जातो. या दिवशी मंदिर परिसराला जत्रेचे रुप येते. गावातील सर्व ग्रामस्थांनी देवीच्या मंदिरात एकमताने चोरीबंदी केली आहे. गाव काळानुरुप बदलत आहे. आधुनिक विचारांचा अवलंब करताना तितक्याच तन्मयतेने परंपराही जोपासल्या जात आहेत. सर्वजण गुण्या-गोविंदाने नांदतात. आई देवी नवलाईच्या छत्रछायेखाली सर्व ग्रामस्थांना अपूर्व सुखाची अनुभूती मिळत आहे.