गुहागर : तालुक्यातील आबलोली ग्रामकृतीदल व पोलीस प्रशासन यांच्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार आबलोली बाजारपेठेतील ज्या व्यापा-यांजवळ कोविड टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट असेल तरच त्यांना आपला व्यवसाय अथवा दुकान उघडण्याची परवानगी देण्यात येत आहे. त्यानुसार पंचायत समिती गुहागरच्या सभापती पूर्वी निमुणकर यांनी प्राथमिक केंद्र आबलोली येथे भेट दिली.
कोवीड चाचणी, लसीकरण याविषयी माहिती घेतली. व्यापारी बांधवांनी आपली कोरोना टेस्ट आपल्या जबाबदारीवर करून घ्यावी. सदर टेस्टचा रिपोर्ट चार दिवसांनी मिळतो म्हणून तो लवकरात लवकर करून आपले व्यवसाय सुरू करण्याचा मार्ग सुकर करावा असे आवाहन त्यांनी केले.तसेच सर्व व्यापारी बांधवांच्या प्राधान्याने टेस्ट व लसीकरण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.त्याला प्रतिसाद देत आबलोलीतील व्यापारी, कर्मचारी यांनी कोविड चाचणी साठी आपले स्वॅब दिले. अहवाल निगेटिव्ह आलेले व्यापारी आपले व्यवसाय सुरू करणार आहेत.