विविधरंगी बलून सजावटीला मिळतोय प्रतिसाद
गुहागर : कोरोना आपत्तीत सुरु असलेल्या लॉककडाऊन काळात कुठेही नोकरी नाही. अशावेळी घरामध्ये फावल्या वेळेत छंद म्हणून जोपासलेल्या असगोली वरचीवाडी येथील आदित्य घुमे या युवकाने विविधरंगी बलूनच्या डेकोरेशनचा व्यवसाय करून आपले उदरनिर्वाहाचे साधन बनविले आहे. त्याच्या या युक्तीचे परिसरातून कौतुक होत आहे.
कोरोना आपत्तीत अनेकांनी आपल्या नोकऱ्या, व्यवसाय, उद्योगधंदे गमावलेले आहेत. अनेकांनी घरीच बसणे पसंत केले आहे. असगोली येथील आदित्य घुमे या युवकाला नोकरी, व्यवसाय काहीच नसल्याने त्याने घरबसल्या फावल्या वेळेत विविधरंगी बलून आणून त्याचे डेकोरेशन कसे करायचे याचे प्रात्यक्षिक सुरु केले. हळूहळू त्याचा हा छंद त्याला व्यवसायासाठी खुणावू लागला. या व्यवसायातून आपण बेरोजगारीवर मात करु शकतो, हे त्याने मनोमन जाणले. अशापध्दतीचे बलून डेकोरेशन कोण करतात, याची चौकशी करुन त्यांना गाठले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने बलून डेकोरेशन व्यवसाय करण्याचा निर्धार केला. आपल्याकडे शिल्लक राहिलेली पुंजी त्याला उपयोगी आली. त्याने विविधरंगी बलून व त्याला लागणारे इतर साहित्य विकत मागविले. एक-दोन ठिकाणी बर्थडे कार्यक्रमाच्या ऑर्डरही मिळवल्या व त्या यशस्वी करुन दाखविल्या. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला.
सद्या विवाह सोहळे, साखरपुडा, नवरात्रोत्सव, दिवाळी, वाढदिवस, बारसे रिसप्शेन पार्टी अशा कार्यक्रमात अलिकडे बलून डेकोरेशनची क्रेझ वाढलेली दिसून येत आहे. नेमके हेच हेरुन आदित्यने बलून डेकोरेशन व्यवसाय सत्यात उतरविण्याचा प्रयत्न केला व तो आता यशस्वी होताना दिसत आहे. त्याने आतापर्यंत 10 ते 12 ऑर्डर केल्या आहेत. त्याची बलून सजावट अनेकांच्या पसंतीत उतरली आहेत. डेकोरेशनची सुबक रचना, जिद्द, मेहनत, कल्पकतेने साधलेला सुंदर मिलाफ, मोहक रंगसंगतीतून बलून कलाकृती आदित्यने जीवंत केल्या आहेत. लोकांचे मिळालेले प्रोत्साहन, मित्रांचे सहकार्य यामुळे या व्यवसायात मी एवढी मजल मारु शकलो, असे आदित्यने सांगितले.