मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती
रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत असावी आणि जिल्हाभरातून याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची वणवण कमी व्हावी यासाठी रत्नागिरीत राज्यातील सगळ्यात मोठी प्रशासकीय इमारत उभारली जाणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात राज्यातील सर्वात मोठी ९ मजली प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीसाठी ४० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, अर्थसंकल्पात २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, टोकन म्हणून ही रक्कम दिल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जुन्या व जीर्ण झालेल्या इमारती पाडून याठिकाणी पुण्याच्या धर्तीवर १ लाख ५० हजार चौरस फुटांची ९ मजली ही इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीत ५० शासकीय कार्यालये असणार आहेत.
या इमारतीच्या सर्वात शेवटच्या मजल्यावर ६०० आसन क्षमतेचे नाट्यगृह बांधण्यात येणार आहे. तसेच एका मजल्यावर पर्यटकांसाठी दालन असेल. रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्याबाबतची सर्व माहिती याठिकाणी मिळणार आहे. पर्यटकांना येण्यासाठी या इमारतीत स्वतंत्र मार्ग असेल, तसेच दिव्यांगांसाठीही स्वतंत्र मार्ग व व्यवस्था या इमारतीत करण्यात येणार आहे, असे सामंत यांनी सांगितले. येत्या आठ दिवसात या इमारतीच्या कामाची निविदा काढण्यात येणार आहे. सद्यस्थितीत या इमारतीसाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली.