खासदार तटकरेंसह पर्यटन व्यावसायिकांनी घेतली एमसीझेडएमच्या अध्यक्षांची भेट
गुहागर, ता. 16 : रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग मधील सीआरझेड प्रश्र्नांबाबत एमसीझेडएमच्या अध्यक्ष व पर्यावरण समितीच्या कार्यकारी सचिव श्रीम. मनिषा म्हैसकर यांच्या कार्यालयात सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीत पर्यटकांची लोकसंख्या विचारात घेवून बांधकामांना परवानगी देणे, अनधिकृत बांधकामांना परवानगीसाठी मुदतवाढ देणे आणि पर्यटन क्षेत्र असलेल्या सीआरझेड 3 मधील गावांना सीआरझेड २ चे नियम लागू करावेत अशी विनंती यावेळी खासदार सुनील तटकरेंनी केली. सदर मुद्द्यांचा सकारात्मक विचार करु असे आश्र्वासन मनिषा म्हैसकर यांनी दिले.
सीआरझेड कायद्यांमधील काही अटी कोकणातील पर्यटन व्यवसाय वाढत असलेल्या गावांना जाचक ठरत आहेत. त्यामुळे गुहागर, दापोलीसह रायगडमधील अनेक पर्यटन व्यावसायिकांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे सीआरझेड विषयात लक्ष घालण्याची मागणी केली होती. या पार्श्र्वभुमीवर खासदार सुनील तटकरे यांनी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग मधील सीआरझेड प्रश्र्नांबाबत एमसीझेडएमच्या अध्यक्ष व पर्यावरण समितीच्या कार्यकारी सचिव श्रीम. मनिषा म्हैसकर यांच्याबरोबर एका बैठकीचे आयोजन केले होते. ही बैठक 15 ऑक्टोबरला मंत्रालयात पार पडली.
सीआरझेड कायद्यात 2019 मध्ये लोकसंख्येबाबतची सुधारणा केली गेली. मात्र कोकणातील कोणत्याच गावांची लोकसंख्या प्रति चौ. कि.मी. 2161 पेक्षा जास्त नाही. मात्र एमटीडीसीच्या क वर्ग पर्यटनासाठी निवडलेल्या समुद्रकिनाऱ्यांजवळी गावांमध्ये येणारी तरंगती लोकसंख्या (फ्लोटींग पॉप्युलेशन) प्रति चौ. कि.मी. 2161 पेक्षा जास्त आहे. हा मुद्दा लक्षात घेवून सदर गावात पर्यटकांची निवासाची सोय व्हावी म्हणून सीआरझेड ३ प्रमाणे उच्चतम भरती रेषपासून 50 मीटरच्या बाहेर बांधकामाला परवानगी मिळणे आवश्यक आहे.
सन 1991 च्या नंतर ज्यांनी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करुन बांधकाम केले. त्यांना ते बांधकाम नियमित करण्याकरीता 2018 मध्ये तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. अशीच तीन महीन्यांची मुदत प्रस्ताव सादर करण्याकरीता मिळावी. त्याकरीता आपण सीआरझेड कायदा समिती व केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचेकडे मागणी करावी. सीआरझेड २ मध्ये समुद्राला लागून रस्ता असेल तर शहरी भागाकरीता रस्त्याच्या पलीकडे बांधकाम करण्यास परवानगी आहे. सदरचा नियम सीआझेड ३ असलेल्या ग्रामीण भागासाठीही लागू करण्यात यावा. असे मुद्दे खासदार सुनील तटकरे यांनी मांडले. हे विषय सकारात्मकपणे सीआरझेड समितीकडे मांडू असे आश्र्वासन श्रीम. मनिषा म्हैसकर यांनी दिले आहे.
या बैठकीला गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, गुहागर मधील पर्यटन व्यावसायिक किरण खरे व मनिष करे, दापोलीतील सीआरझेडचे अभ्यासक दिपक विचारे, कर्दे गावचे सरपंच सचिन तोडणकर, हॉटेल व्यावसायिक नरेश पेडणेकर, मंगेश मोरे आदी उपस्थित होते.
पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत श्रीवर्धन, दापोली व गुहागर तालुक्यातील पर्यटक अभ्यासकांची पर्यटन विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे. अशी माहिती यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी दिली.