रत्नागिरी जिल्ह्यासह मुंबई, रेवस बंदरातील बोटी दाभोळ खाडीत
गुहागर : राज्यासह तालुक्याला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. तसेच येत्या काही तासात कोकण किनारपट्टीला वेगवान वाऱ्याचा तडाखा बसणार असल्याने हवामान खात्याकडून रेड अलर्ट जाहीर करण्यात आले आहे. समुद्र खवळलेला असल्याने गुहागर तालुक्यासह मुंबई, रेवस, आदी बंदरातील अनेक मच्छिमारी बोटींनी दाभोळ खाडीचा आसरा घेतला आहे. दाभोळ खाडी बरोबरच वेलदूर, अंजनवेल किनारी सुमारे साडेतीनशे नौका बुधवारी सायंकाळपासून उभ्या आहेत.


कोरोनाचे संकटामुळे लॉकडाऊनमध्ये ऐन हंगामात मच्छीमारांना आपल्या नौका बंदरात उभ्या कराव्या लागल्या. त्यानंतर सुरु झालेला मासेमारी हंगाम ऐन बहरात असताना अचानक बदललेल्या हवामानाचा फटका मच्छी व्यवसायाला बसला आहे. नव्या हंगामात वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे मच्छीमार पुरते हैराण झाले आहेत. त्यातच १५ ऑक्टोबरला कमी दाबाचा पट्टा निर्माण होवून समुद्रात चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. 15 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर दुपारपर्यत गुहागर, दापोली येथील समुद्रातील चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती रहाणार आहे.


खराब हवामानामुळे गुहागर तालुक्यातील साखरीआगर, वेळणेश्वर, असगोली, अंजनवेल, वेलदूर, धोपावे येथील मच्छिमारांनी आपल्या नौका सुरक्षित ठिकाणी किनाऱ्यावर आणल्या आहेत. हवामान खात्याने किनारपट्टीला अतिदक्षतेच्या सूचना केल्याने मच्छिमार नौका समुद्रात घेऊन जाऊ नये, असे आदेश प्रशासनाच्या वतीने मच्छीमारांना देण्यात आले होते.
वेगवान वाऱ्यामुळे खवळलेल्या समुद्रात बोट बुडण्याची शक्यता अधिक असते. तसेच पाण्याला करंट मारत असल्याने नौका समुद्रात एका जागेवर उभ्या ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे मुंबई, रेवस, आदी बंदरातील मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेल्या बोटींनी सुरक्षित जागा म्हणून दाभोळ खाडी आपल्या बोटी उभ्या केल्या आहेत. दाभोळ खाडीत बुधवारपासून सुमारे ३५० नौका उभ्या आहेत. या खराब हवामानामुळे लाखो रुपयांचे नुकसान मच्छीमारांना सोसावे लागत आहे.