गुहागर : नगरपंचायतीने शहरातील स्वच्छतेसाठी नव्या अत्याधुनिक यंत्रांची खरेदी केली आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत डीपीआर मधुन 26 लाख 13 हजार 700 रुपयांचा निधी मिळवला. त्यातून नगरपंचायतीने प्लास्टीक बेलींग मशीन, हातगाड्या, चिपर श्रेल्डर मशीन आणि 3 कचरा संकलन वाहनांची खरेदी केली. तर 14 व्या वित्त आयोगामधील 50 टक्के स्वच्छता निधीतून 31 लाख 97 हजार 575 रुपयांचा निधी मिळवून ट्रिनिटी सक्शन व्हॅन आणली. अशाप्रकारे गेल्या 10 महिन्यात स्वच्छतेसाठी 58 लाख 11 हजार 275 रुपयांच्या सुविधांची निर्मिती नगरपंचायतीने केली आहे.
गुहागर शहर स्वच्छ रहाण्यासाठी नगरपंचायत प्रयत्नशील आहे. नगराध्यक्ष राजेश बेंडल आणि स्वच्छता व आरोग्य सभापती अमोल गोयथळे यांनी 26 जानेवारी 2020 ला तिन कचरा संकलन वाहनांचे उद्घाटन केले. त्यासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत डीपीआर मधुन 17 लाख 40 हजाराचा निधी उभा केला. आज संपूर्ण शहरातील कचरा निर्मुलनाचे काम या वाहनांद्वारे होत आहे. त्याचबरोबर नगरपंचायतीने 4 लाख 96 हजार 200 रुपयांचे प्लास्टीक बेलींग मशीनही नुकतेच खरेदी केले आहे. या मशीनमुळे प्लास्टीक बाटल्या अन्य कचऱ्याची पावडर बनविणे शक्य होणार आहे. शहरातील अन्य ठिकाणचा कचरा गोळा करण्यासाठी 80 हजार रुपयांच्या हातगाड्यांची खरेदीही करण्यात आली आहे.
गुहागर शहरातील बागांमधुन नारळी पोफळींच्या झावळांचा कचरा तयार होतो. पारंपरिक पध्दतीत बागायतदार या झावळा वाडीत खड्डा तयार करुन त्यामध्ये टाकतात. त्याचे खत तयार होते. पण अन्य सार्वजनिक ठिकाणच्या झावळांचे संकलन करुन त्यापासून पावडत तयार करण्यासाठी 2 लाख 97 हजार 500 चिपर श्रेल्डर मशीनची खरेदीही नगरपंचायतीने केली आहे. हे मशिन प्रत्येकाच्या वाडीपर्यंत जावू शकत नाही. त्यामुळे अन्य बागायदारांनाही आपल्या बागांमधील झावळांपासून तत्काळ खत करायचे असेल तर त्याची व्यवस्था नगरपंचायत करणार आहे.
गुहागर नगरपंचायतीने 14 व्या वित्त आयोगामधील 50 टक्के स्वच्छता निधीतून 31 लाख 97 हजार 575 रुपयांचा निधी खर्च करुन ट्रिनिटी सक्शन व्हॅन (हनि व्हॅगन) म्हणजेच शौचालयाच्या खड्ड्यातील मैला उपसणारी गाडी खरेदी केली आहे. या वाहनामुळे शौचालयांचे खड्डे साफ करणे सुलभ होणार आहे.
या नव्या तंत्रज्ञानाच्या सयंत्रांमुळे गुहागर शहरातील स्वच्छता अभियान एक पाऊल पुढे जाणार आहे. बागेतील कचऱ्याची पावडर होत असल्याने त्याचाही फायदा बागायदारांना होणार आहे. प्लास्टीक कचऱ्याचे विघटन होत नसेल तरी पावडरला बाजारात मागणी आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या उत्पन्नामध्येही मोठी भर पडणार आहे. सद्यस्थितीत या सर्व वस्तुंची खरेदी झाली आहे. वापरण्यासाठीची योजनाही बनली आहे. अल्पावधीतच त्याचे धोरण नगरपंचायत जाहीर करणार आहे.