गुहागर, ता. 14 : येथील नगरपंचायतीने आणलेल्या ट्रिनिटी सक्शन व्हॅनचे उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांनी केले. 14 व्या वित्त आयोगामधील 50 टक्के स्वच्छता निधीतून 31 लाख 97 हजार 575 रुपयांचा निधी खर्च करुन गुहागर नगरपंचायतीने ही व्हॅन आणली आहे. शहरवासियांसाठी एक नवी सुविधा यामुळे उपलब्ध झाली आहे.
शासनाने स्वच्छता अभियानामध्ये प्रत्येक घरात शौचालयाचा आग्रह धरला. या अभियानामुळे शौचालयांची संख्या वाढली. मात्र शोषखड्ड्यात साठणारा मैला ही नवी समस्या समोर आली. नव्या ट्रिनिटी सक्शन व्हॅनमुळे शोषखड्डयातील मैला काढणे आता सोयीचे होते. त्यामुळे गुहागर नगरपंचायतीने स्वच्छता निधीमधुन या वाहनाची खरेदी केली आहे. सदर वाहन भाडेतत्त्वावर गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांना उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्यासाठीची नियमावली अल्पावधीतच तयार केली जाणार आहे. सदर वाहनाचे उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांनी केले. यावेळी गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, बांधकाम सभापती अभय साटले, आरोग्य व स्वच्छता सभापती अमोल गोयथळे, भाजपचे गटनेते व शिक्षण सभापती उमेश भोसले, नगरसेविका प्रणिता साटले, गुहागर नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, राष्ट्रवादी काँग्रसेच्या जिल्हा आघाडीच्या सौ. संपदा गडदे आदी उपस्थित होते.