शौर्य पदक आणि दिपक जोग पुरस्काराने सन्मानित गुहागरचा सपुत्र
गुहागरचे सपुत्र, मुंबई लोहमार्ग पोलीस विभागीतील पोलीस निरिक्षक यांना कोविड योद्धा पुरस्कार देवून झी २४ तासने गौरविले आहे. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यात दहशतवादी अबु इस्माईल खान याला हेमंत बावधनकर यांनी ठार केले होते. त्याबद्दल शौर्य पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. तर साडेतीन वर्षाच्या मुलीच्या खूनाची केसचा यशस्वी तपास केल्याबद्दल बावधनकर यांना जून 2017 मध्ये दिपक जोग स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
गुहागरमधील कै. अनंत बावधनकर यांचे सुपुत्र, पत्रकार मनोज बावधनकर यांचे चुलत बंधु आणि गजानन बावधनकर यांचे पुतणे हेमंत बावधनकर सध्या मुंबई पोलीसांच्या लोहमार्ग पोलीस विभागात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. कोरोनाच्या संकटात (लॉकडाऊन २) परप्रांतिय मजुरांना आपल्या घरी जाण्यासाठी विशेष रेल्वेंची व्यवस्था करण्यात आली होती. एप्रिल, मे या दोन महिन्यात मुंबईच्या रेल्वेस्थानकांवरुन तब्बल २ लाख ६ हजार ३४३ रेल्वे सोडण्यात आल्या. या रेल्वेंद्वारे जाणाऱ्या प्रवाशांचे नियोजन करण्याची जबाबदारी लोहमार्ग पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांच्यावर होती. त्यांनी सामाजिक अंतराचे भान राखले जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर चौकोन रंगवून घेतले होते. रेल्वेत जागा मिळविण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडणार नाही. पाणी, अन्न पदार्थांचे वाटप सर्वांपर्यंत पोचले. तेथेही शिस्त पाळली जाईल. यासाठी आवश्यक आखणी केली. लाखो मजुर रेल्वेने जाताना तेथे असणारे पोलीस, रेल्वे कर्मचारी यांना कोरोना होणार नाही याचीही काळजी घेतली. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार रेल्वेस्थानंकांवर घडला नाही. कोणताही गुन्हा घडला नाही. त्यांनी केलेल्या या व्यवस्थापनाची नोंद झी 24 तास ने घेतली. २ ऑक्टोबरला गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस महासंचालक संजीव जयस्वाल, आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या उपस्थित राज्यातील पोलीसांचा सन्मान झी २४ तास ने केला. याच कार्यक्रमात हेमंत बावधनकर यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
हेमंत बावधनकर यांनी 26/11 च्या मुंबई हल्ल्यात (2008 साली) महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. हल्ल्यानंतर दोन दहशतवादी अपहृत केलेल्या स्कोडा कारमधुन मरीन ड्राईव्ह, गिरगांव चौपाटी परिसरात गेले असल्याचा वायरलेस संदेश आला. त्यावेळी गिरगांव चौपाटीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर आणि सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक कै. तुकाराम ओंबळे यांनी ती गाडी पाहिली. बावधनकर यांनी कारचालक दहशतवादी अबु इस्माईल खानवर तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एका गोळीने डोक्याचा वेध घेतला. अबु इस्माईल खान ठार झाल्यानंतर अजमल कसाबला तुकाराम ओंबळेंनी पकडले होते. त्यावेळी कसाबने केलेल्या गोळीबारात तुकाराम ओंबळे हुतात्मा झाले. हेमंत बावधनकर यांना या कामगिरीबद्दल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
5 डिसेंबर 2016 ला नागपाडा पोलीस ठाणे परिसरातील साडेतीन वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. कनिष्ठ महाविद्यालयातील एका मुलाने या मुलीचा खून केला होता. तब्बल 20 दिवस हा घटनेचा तपास सुरु होता. सुरवातीला बेपत्ता मुलीचे पैशांसाठी अपहरण झाल्याचे भासविण्यात आले. त्यामुळे तपासाची दिशा बदलली. अखेर सुमारे 6500 फोन कॉल्सचे पृथकरण केल्यानंतर पोलीस सदर मुलापर्यंत पोचले. ही केस अत्यंत क्लिष्ट होती. मात्र पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर आणि उपनिरीक्षक धीरज भालेराव यांनी या खुनाचा छडा लावला. त्यामुळे मुंबईत पोलीसांमध्ये मानाचा समजला जाणारा कै. दिपक जोग स्मृती पुरस्कार देवून त्यांना गौरविण्यात आले. माजी पोलीस उपमहानिरीक्षक ज्युलीओ रिबेरो आणि तत्कालिन मुंबई पोलीस कमिशनर दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते 22 जून 2017 ला हा पुरस्कार देण्यात आला. अशा पध्दतीने गुहागरचे सपुत्र हेमंत बावधनकर यांनी मुंबई पोलीस विभागात कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे.

