गुहागर : येथील लॅन्ड डेव्हलपमेंटचा मुळ व्यवसाय असलेले आणि प्रसिद्ध क्रिकेटर संदेश कलगुटकर यांनी खानू येथील जागेत सुमारे १० गुंठयात एसके – ४ या जातीच्या हळद लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. सद्याची हळद पिकाची वाढ व परिस्थिती बघता या प्रयोगातून त्यांना समाधान लाभल्याचं मत व्यक्त केलं.
कलगुटकर हे लॅन्ड डेव्हलपर्स या व्यवसायातील. मात्र २००० साली गुहागरला असताना रानवीच्या माळावर मुंबई येथील श्री. मोदी यांच्या फुलशेतीच्या प्लॉट डेव्हलप करताना शेतीची आवड निर्माण झाली. त्याच वर्षी त्यांनी चिखली येथील जागेत सुपारीची लागवड केली. संदेश कलगुटकर २००८ साली व्यवसायानिमित्त रत्नागिरी येथे राहायला आले. त्यांना असलेल्या आवडीबद्दल ते म्हणतात, मला निसर्गाविषयी लहानपणा पासूनच आवड होती. माझी लांजा तालुक्यामध्ये मठ या महामार्गाजवळ एक एकर जागा होती. त्या ठिकाणी थोडे नारळ व आंबा लागवड होती. तिथे मी एखादे हॉटेल अथवा पेट्रोल पंप सुरु करण्याचे नियोजित होते. पण गेल्या वर्षी मी भात व थोडी हळदीचे २५ कंद लागवड केली. तेव्हा कोणतंही नियोजन नव्हते. भात ज्या वेळी तयार झाला त्यावेळी त्यावर झालेला खर्च व मिळणारे उत्पन्न यात खूप तफावत होती व तोट्याचे गणित निघालं. पण जी हळद अशीच लावलेली होती ती चांगली निघाली .
यावर्षी मी लॉकडाऊनमध्ये अचानक निर्णय घेऊन थोड्या मोठया प्रमाणात हळद लागवडीचा विचार केला. एसके या हळद जाती विषयी गजेंद्र पौनीकर यांच्याशी चर्चा करून लागवड करण्याचे ठरवले. त्यांनी दरम्यान प्लॉटची पाहणीही केली होती. श्री. पौनीकर यांनी २५० किलो एसके -४ जातीचे बियाणे (क॔द )बियाणे उपलब्धता दर्शविल्यावर मी जमीन नांगरून घेतली. साधारण २५ गुंठे नांगरणी खर्च १००० झाला. त्यानंतर त्यामध्ये ६ गाडया शेणखत मिसळले. व आबलोली येथील एसके -४ जातीचे संशोधक सचिन कारेकर व गजेंद्र पौनीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मातीचे वाफे करून १ फूट × १ फूट जोडओळ पद्धतीने लागवड केली. दोन रांगेत पुरेसे अंतर ठेवले. कंद बविस्टीन व क्लोरोपायरीफॉसच्या द्रावणातून बुडवून काढून लावली. मी या वर्षी २५० किलो कंद लागवड सुमारे १० गुंठे क्षेत्रात केली आहे. लागवड करताना प्रत्येक खड्ड्यात शेणखत, २५ ग्रॅम सुफला व २५ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्पेट घातले.
साधारण ४ जूनला लागवड केली. त्यानंतर कंद वर आल्यावर थोडया दिवसांनी गवताची बेननी केली. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात रोपांना मातीची भर देण्यात आली. मातीची भर देताना पुन्हा प्रत्येक रोपांना २० ग्राम सुफला व १० ग्राम डीएपी खत दिले. थोडे निमपावडर व सुक्ष्म अन्न द्रव्याचासुद्धा वापर केला. त्यामुळे रोपांनी चांगला जोर धरला. त्यानंतर सप्टेंबरमध्ये पुन्हा बेननी केली. आता पावसानंतर असताना ठिबकच सिंचनने पाणी द्यायचे नियोजन आहे.
मला आवर्जून सांगावेसे वाटते की, मला श्री पौनीकर, सचिन कारेकर, रोहा येथील प्रवीण पटेल हे वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. आज शेतीकडे बघून खूपच समाधान होत आहे व खरा खुरा शेतकरी झाल्याचा अभिमान वाटतो, असंही त्यांनी सांगीतले. तसेच मी या प्लॉट मध्ये बुश पध्दतीने काळीमिरी व फळबाग लागवड केली आहे . काळीमिरी लागवडीला भाटे नारळ संशोधन केंद्राचे डॉ. वैभव शिंदे याचे मार्गदर्शन लाभले. भविष्यात मी तिथे कृषि पर्यटन व कृषी विषयक माहिती देणेचे नियोजन आहे, असे श्री. कलगुटकर यांनी सांगितले.