गुहागर : शासनाकडून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती(उमेद) अभियानांतर्गत कर्मचारी, कंत्राटी अधिकारी यांच्या पुनर्नियुक्ती थांबविण्यात आले आहेत. त्याविरोधात उमेदचे सर्व कंत्राटी अधिकारी, कर्मचारी ५ ऑक्टोबर २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत.
उमेद अभियानांतर्गत कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्ती थांबवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. उमेदमधे राज्यभरात ३००० हून अधिक कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. रत्नागिरी जिल्हा करता एकूण १३५ पदे मंजूर असून त्यापैकी ८४ पदे भरली गेली आहेत. इतक्या कमी मनुष्यबळात काम करत असताना जिल्ह्यातील ६ पदांवरील अधिकारी, कर्मचारी यांना कार्यमुक्त करण्यात आलेले आहे. त्याप्रमाणेच भविष्यात जिल्ह्यातील इतरांना सुद्धा कार्यमुक्त केले जाईल अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. उमेद अंतर्गत ग्रामीण भागातील गरीब, गरजू कुटुंबांना स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून संघटीत करण्याचे काम सुरू आहे. शासनाच्या निर्णयामुळे या अभियानांतर्गत काम करत असणाऱ्या कंत्राटी कर्मचारी व अधिकारी यांच्या सेवा खंडित होणार आहेत. जे समूह किंवा संस्था या कर्मचारी, अधिका-यानी मेहनत घेऊन,विविध समस्यांना सामोरे जात, अथक प्रयत्नाने उभे केले आहेत त्या आहे त्या स्थितीत सोडून देणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांना अनपेक्षितपणे थांबवणे, हे त्या समूहातील – संस्थेतील सहभागी सदस्य,कर्मचारी व अधिकारी यांच्यावर अन्यायकारक आहे. याबाबत शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता उमेद अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात काम करणारे सर्व कर्मचारी,अधिकारी पाच ऑक्टोबर २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहेत. उमेद अभियानातील पदभरती कायम ठेवणे, त्यांच्या पुनर्नियुक्ती करणे,ही पदभरती बाह्य यंत्रणेकडून करण्यात येऊ नये ५८ वयापर्यंत रोजगाराची हमी मिळावी, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजना लागू करावी, मागणी व सोयीनुसार बदली मिळावी अशा मागण्या उमेदच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वतीने शासनाकडे करण्यात आल्या असून याबाबतचे निवेदन रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.