गुहागर : महाराष्ट्र राज्यात कोरोना संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोना संक्रमणापासून आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांना वाचविण्यासाठी निर्मल ग्रुप ग्रामपंचायत अंजनवेलने उपाययोजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत निर्मल ग्रुप ग्रामपंचायत अंजनवेलने बालरोग तज्ञ डॉ.शशांक ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंजनवेल ग्रामपंचायत आरोग्य उपचार केंद्राद्वारे ग्रामस्थांना मोफत औषध वाटप सुरू केले आहे. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या उपचार केंद्रात रविवार ते शुक्रवार दररोज सकाळी ९ ते १०.३० वाजेपर्यंत व सायंकाळी ४ ते ५.३० वाजेपर्यंत डॉ. शशांक ढेरे हे सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी व डोकेदुखी असलेल्या रुग्णांना तपासून औषध उपचार देतात. तसेच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कोणी नॉर्मल, लक्षणे नसलेला परंतु पॉझिटिव्ह होम क्वारंटाईन रुग्ण असेल तर त्याला भेट देऊन औषधोपचाराची व्यवस्था करतात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून व कोरोना संक्रमणावर मात करण्यासाठी ग्रामस्थांची रोग प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामस्थांना व्हिटॅमिनयुक्त औषधे देण्याचा ग्रुप ग्रामपंचायत अंजनवेलने एक उपक्रम हाती घेतला आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ५५० कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला व्हिटॅमिनयुक्त औषध वाटप करण्यात आले. तसेच उर्वरित कुटुंबांना औषध वाटप चालू आहे. या उपक्रमासाठी होणारा खर्च निर्मल ग्रुप ग्रामपंचायत अंजनवेलच्या ग्रामनिधीतून करण्यात येत आहे.
यावेळी सरपंच यशवंत बाईत, उपसरपंच आत्माराम मोरे, सदस्य जवाहर तांडेल, सदस्या श्रीम. स्वाती वाघे, श्रीम. वेदिका भुवड, श्रीम. अनिता मेढेकर, व श्रीम. साक्षी सैतवडेकर, ग्रामविकास अधिकारी विलास बैकर, डॉ. शशांक ढेरे, परिचारिका पूजा जाधव, ग्रामपंचायत शिक्षिका श्रीम. अहिरराव, श्रीम. देवळेकर, श्रीम. गुळेकर, श्रीम. पड्याळ, श्रीम. मुकादम व कु. पाटणकर, संतोष, सागर, अनिष व वैभव आदी उपस्थित होते.