ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या अभ्यासासाठी उपक्रम
गुहागर, ता. 16 : अंडी घातल्यानंतर मादी कासव कुठे जाते. विणीच्या एकाच हंगामात एकापेक्षा जास्त वेळा ते कासव पुन्हा त्याच समुद्रावर अंडी घालण्यास येते का, त्यांचा प्रवास कसा होतो. याचा अभ्यास करण्यासाठी सध्या ऑलिव्ह रिडले मादी कासवाचे ट्रॅकिंग आपण करत आहोत. अशी माहिती भारतीय वन्यजीव संस्थेचे (Wildlife institute of India) डॉ. आर. सुरेशकुमार यांनी Guhagar Newsला दिली. Satellite Tagging to Olive Ridley Turtle
गुहागरच्या समुद्रावरुन ट्रान्समिटर लावण्यात आलेल्या मादी कासवाचे नाव वनश्री असे ठेवण्यात आले आहे. हेच नाव पुढील संशोधनासाठी नोंदण्यात आले आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यात वनश्रीचा संचार जगभरातील अभ्यासकांना कळणार आहे. यापूर्वी वेळास आणि आंजर्ले येथील प्रत्येकी एका मादी कासवाला सॅटेलाइट ट्रान्समिटर लावण्यात आले होते. वेळासमध्ये सोडलेल्या मादी कासवाचे नाव प्रथमा असे ठेवण्यात आले आहे. तर आंजर्ले सोडलेल्या कासवाचे नामकरण सावनी असे करण्यात आले आहे.
Satellite Tagging to Olive Ridley Turtle
भारतीय वन्यजीव संस्था (Wildlife institute of India) , वन खाते आणि कांदळवन प्रतिष्ठान या तीन संस्थांतर्फे हा उपक्रम सुरु आहे. तिन्ही संस्थाचे अधिकारी, कर्मचारी सोमवारी (ता. 14) रात्रभर समुद्रावर गस्त घालत होते. गुहागर वरचापाट परिसरात अंडी घालण्यासाठी आलेले कासव सापडले. अंडी घातल्यानंतर या कासवाला पकडण्यात आले. त्याच्या पाठीवर सॅटेलाईट टॅगिंगसाठी ट्रान्समिटर लावण्यात आला. मंगळवारी (ता. 15) सायंकाळी या मादीला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. मंगळवारी रात्री 10.30 च्या सुमारास आणखी दोन कासवे अंडी घालण्यासाठी समुद्रावर आली. त्यांना सॅटेलाई ट्रान्समिटर लावण्याचे काम बुधवारी (ता. 16) सकाळी करुन समुद्रात सोडण्यात आले.
कासवाच्या पाठीवर लावलेल्या उपकरणामध्ये दोन वर्ष चालेल एवढ्या क्षमतेची बॅटरी आहे. सॅटेलाईटच्या कक्षात हा ट्रान्समिटर आल्यानंतर कासवाच्या पाठीवरुन संदेश अमेरीकेतील ओशोनिक ॲण्ड ॲटमोस्फीरिक ऑर्गनायझेशन (National Oceanic and Atmospheric Administration, US) या संस्थेकडे जातो. तेथून तो संशोधकांपर्यंत पोचतो. ही सर्व प्रक्रिया स्वयंचलीत असते. वेळासमध्ये ट्रान्समिटर लावून सोडलेले कासवे आजही जयगड ते श्रीवर्धन याच परिसरात फिरत आहेत. तर आंजर्ले मधील कासव आंजर्ले ते वेळास दरम्यान फिरत आहे. विशेष म्हणजे वेळासमधुन सोडलेले कासव मंगळवारी (ता. 15) गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे 75 कि.मी. खोल समुद्रात होते. अशी माहिती भारतीय वन्यजीव संस्थेचे (Wildlife institute of India) डॉ. आर. सुरेशकुमार (Dr. R. Sureshkumar) यांनी दिली.
यावेळी कांदळवन कक्ष, मुंबईचे अप्पर प्रधान वनरक्षक डॉ. विरेंद्र तिवारी, उप वनसंरक्षक आदर्श रेड्डी, मुंबई, दिलीप खाडे, विभागीय वनाधिकारी रत्नागिरी, सचिन निलख विभागीय सहाय्यक वनाधिकारी रत्नागिरी, राजश्री कीर परिक्षेत्र वनाधिकारी चिपळूण, राजेंद्र पाटील परिक्षेत्र वनाधिकारी कांदळवन कक्ष, गुहागरच्या तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे, नगराध्यक्ष राजेश बेंडल, रामदास खोत वनपाल चिपळूण, संतोष परशेट्ये वनपाल गुहागर, अरविंद मांडवकर आणि संजय दुंडगे वनरक्षक गुहागर, नीलेश बापट मानद वन्यजीव रक्षक चिपळूण, कासवमित्र संजय भोसले व हृषिकेश पालकर गुहागर, मोहन उपाध्ये वेळास, अभिनय केळस्कर आंजर्ले, यांच्यासह कासवप्रेमी उपस्थित होते. Satellite Tagging to Olive Ridley Turtle