Memories of Sindhutai
15 फेब्रुवारी 2018 मध्ये महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने गुहागर मधील श्री व्याडेश्र्वर देवस्थानने सिंधुताई सपकाळ यांना गुहागरमध्ये बोलाविले होते. गुहागरमधील त्यांच्या आठवणींना उजाळा देवून पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना गुहागर न्यूजतर्फे श्रद्धांजली. (Memories of Sindhutai)
याचवर्षी पद्मश्री पुरस्काराने भारत सरकारने सन्मानित केलेल्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे मंगळवार, 4 डिसेंबर रोजी निधन झाले. अनाथांची माय (Mother of Orphans) म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ओळख असलेल्या माई, सिंधुताई 75 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वीच सिंधुताई यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालय, पुणे येथे हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृती बिघडली म्हणून त्यांना पुन्हा गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे या गावी झाला. त्यांचे नाव चिंधी ठेवण्यात आले होते. गरिबी, अन्याय, अत्याचार यासारख्या असंख्य यातना भोगलेल्या सिंधुताईनी 1992-93 मध्ये अनाथ मुलांना आधार देण्याच्या कामाला सुरवात केली.
Memories of Sindhutai
गुहागर, ता. 16.2.2018 : मला 286 जावई आणि 36 सुना आहेत यापैकी एकाही मुलाचा वा जावयाचा संसार मोडला नाही. उलट सासुसासरे आणखी एक मुलगी पदरात द्या म्हणून मागणी करतात. याचे कारण त्या लेकरांवर लहानपणापासून केलेले संस्कार आहेत. मुलगी ही आपली अस्मिता आहे, संस्कृती आहे. भारतमातेची कन्या आहे. तिला जपा. असे आवाहन सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांनी गुहागरमध्ये केले. (Memories of Sindhutai)
श्री देव व्याडेश्र्वर देवस्थानच्या देवस्थानच्या महाशिवरात्री उत्सवानिमित्त सिंधुताई सपकाळ यांच्या अनुभवकथनाचा कार्यक्रम रंगमंदिर येथे झाला. पद्मश्री (2021), 3 राष्ट्रपती पुरस्कारांसह 272 पुरस्कारांनी सन्मानित सिंधुताईंचा कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी तालुक्यातून शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. गदिमा, संत तुकडोजी, नामदेव, मुक्ताई, बहिणाबाई, जनाई, शांता शेळके यांचे अभंग, कवितांचे दाखले देत दुसऱ्यासाठी जगा असा संदेश त्यांनी दिला.
सिंधुताई म्हणाल्या की, वयाच्या 19 व्या वर्षी शेणाची मजुरी मिळावी म्हणून संघर्ष केला. तो यशस्वी झाला. पण त्यातूनच एक वैरी निर्माण झाला. 9 महिन्यांची गरोदर असलेल्या माझ्यावर या वैऱ्याने संसारात विष कालवले. माझ्या नवऱ्याला सांगितले की तिच्या पोटात वाढणारे मूल माझे आहे. संसार उद्ध्वस्त झाला. 350 गायींच्या पायदळी देण्यासाठी मला सासरच्यांनी गोठ्यात डांबले. तिथेच प्रसूती झाली. एक गायीने मला व मुलीला वाचवले. जीव वाचविण्यासाठी माहेरी आले पण जन्मापासून मुलगी म्हणून छळणाऱ्या आईनेही हाकलून दिले. पोटासाठी दाही दिशा फिरताना भीक मागणारी, भजनवाली बाई म्हणून माझी ओळख झाली. कधी रेल्वेचा फलाट तर कधी स्मशान हेच घर झाले. तीनवेळा मरण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. संताच्या अभंगानी जगण्याचा संदेश दिला. त्यातूनच अनाथांची माई ( Mother of Orphans) म्हणून काम सुरू झाले. दुसऱ्यांच्या मुलांची आई बनताना भेदभाव नको म्हणून माझ्या मुलीला श्रीमंत दगडूशेठ संस्थानच्या हवाली केले. जीवनाने भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असल्याचे शिकविले. (Memories of Sindhutai)
मुखोद्गत असलेल्या अनेक कविता, अभंग आणि शेरोशायरीतून सिंधुताईंनी प्रेक्षकांना भरपूर हसविले आणि रडवले देखील. दोन तास प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन त्यांचा प्रत्येक शब्द मनात साठवीत होते. भाषणाच्या शेवटी त्यांनी विनयला बोलावले. सव्वा महिन्याच्या विनयला फलाटावरून आणून वकील केल्याचे सांगितले तेव्हा प्रेक्षागारात सन्नाटा पसरला होता.
करते भाषन म्हणून मिळते राशन
अनुभव कथनाच्या शेवटी ‘माझ्या लेकराबाळांसाठी तुमच्यातला एक घास मला द्या’ असे भावनिक आवाहन सिंधूताईंनी केले. जनता हेच माझे घर, सरकार आहे. तेच माझ्या लेकरांना अन्न देतील. असे सांगत मी शासनाचे अनुदान नाकारले. शेकडो पुरस्कार मिळाले पण ते खायला भाकर देत नाहीत. मी अशी भटकते, तुमच्याजवळ बोलते त्यातून तुम्ही जे देता त्यातून माझ्या शेकडो बाळांचे पोट भरते. केवळ महाराष्ट्रातील नव्हेतर जगातील जनता माझ्या लेकराबाळांच्या पाठीशी उभी आहे. हाच माझा खरा पुरस्कार आहे. Mother of Orphans
उपस्थित प्रेक्षकांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला. द्विभूज सिध्दीविनायक मंदिराचे मधु तांबे यांनी पत्नीच्या स्मरणार्थ 20 हजार रुपयांची देणगी सन्मती बाल निकेतन संस्थेला दिली. (Memories of Sindhutai)
गुहागर तालुकावासियांनी केला सिंधुताईंचा सत्कार
अनुभव कथनासाठी गुहागरमध्ये आलेल्या सिंधुताई सपकाळ यांचा श्री व्याडेश्र्वर देवस्थानच्या वतीने तहसीलदार सौ. वैशाली पाटील यांनी सत्कार केला. त्याचप्रमाणे गुहागर तालुका भंडारी महिला मंडळ, प्रतिभा कलोपासक महिला मंडळ, नगरपंचायत गुहागर, प्रजापिता ब्रह्मकुमारी, श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, होमगार्ड समादेशक कांबळे सर, जिवनश्री प्रतिष्ठान, शिवतेज फाऊंडेशन, हनुमान मित्रमंडळ, ब्रह्मचैतन्य उपासना केंद्र, लक्ष्मी नारायण देवस्थान फंड, खातू मसाले उद्योग, हॉटेल अन्नपूर्णा, महाराष्ट्र साहित्य परिषद, ज्ञानरश्मी वाचनालय, नामदेव शिंपी समाज महिला मंडळ, सखी ग्रुप, राजू बावधनकर परिवार, पालशेतकर विद्यालय, तात्यासाहेब नातू प्रतिष्ठान या संस्थानीही सिंधुताईना गौरविले. (Memories of Sindhutai)
माणुसकी, नैतिकता व संस्कार संपल्याने समस्या : सिंधुताई
समाजातील माणुसकी, नैतिकता आणि संस्कार संपले आहेत. वासना बळकट झाली आहे. पैशामागे फिरताना दातृत्वाचा आधार संपत चालला आहे. माझ्यासारख्या अनेक संस्था या समस्येच्या निराकरणासाठी काम करत आहेत तरीही अनाथांची समस्या संपत नाही. अशी खंत सिंधुताईंनी व्यक्त केली.
सिंधुताई सपकाळ गुहागरमध्ये आल्या असता त्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्या म्हणाल्या की समाजाने मला टाकून दिले. मी समाजसेवक नव्हते. परिस्थितीने मला या क्षेत्रात आणले. आजवर 1050 अनाथ मुलांची मी माय बनले. (Mother of Orphans) 268 मुलींची लग्न केली. 36 सुना आणल्या. माझी सर्व मुले उच्चशिक्षित आहेत. गेली 40 वर्ष हे काम करत आहेत. मलाही वाटते की हे काम थांबवले पाहिजे. पण त्यासाठी मुले अनाथ होणार नाहीत याची जबाबदारी घेणारा समाज निर्माण होण्याची गरज आहे. समाजातील माणुसकी संपल्याने आजही गर्दीच्या ठिकाणी आईच्या प्रेतावरुन मुले उचलून आणतो. वासनेपोटी कुमारीमातांचे प्रमाण वाढतयं. मुली आजही नकोशाच आहेत. (Memories of Sindhutai)
आज पोरींच्या संसारात आया लुडबुड करतात. सासुला सून नको असते. सुनेला सासु नको असते. शिकल्यासवरल्याने अक्कल येते पण संसार करायला आईबापाने संस्कार करावे लागतात. पण पैशामागे धावताना आईबापाला पोरांवर संस्कार करायला वेळ नाही. म्हणून लग्नाला वर्ष, सव्वा वर्ष झालेल्या मुली माघारी येतात.
आज माझ्यासारखे काम करणाऱ्या अनेक संस्था निर्माण झाल्या आहेत. हे काम माझ्याच प्रेरणेतून व्हावे असा आग्रह कधी धरला नाही. मी पहिले अनाथालय ( Mother of Orphans) चिखलदरा येथे सुरु केले. आज सन्मती बाल निकेतन हडपसर, ममता बाल सदन सासवड, अभिमान बालभवन वर्धा या चार संस्था माझ्याकडे शिकून मोठ्या झालेल्यांनी सुरू केले. सासवडमधील अनाथालय माझी मुलगी चालविते. या संस्थाचा खर्च उभा करण्याचे काम मी करते. शासनाकडून अनुदान घेत नसल्याने आजही जगभर पदर पसरत फिरते आहे. (Memories of Sindhutai)
काही संस्थाचालकांमध्ये कामाचा गर्व, अहंकार निर्माण होतो. हे चुकीचे आहे. हे काम समाजाचे असल्याने शासन आणि संस्थांनी समन्वयातूनच केले पाहिजे. सेवा करणे म्हणजे कायद्याला टाळणे नव्हे. संस्था म्हणून आवश्यक त्या नोंदी, हिशोब ठेवलेच पाहिजेत. मात्र प्रशासकीय अधिकार्यांनीही या संस्था संकटांना सामोरे जात उभ्या राहतात हे लक्षात घेतले पाहिजे. असे काम करताना काही शत्रु निर्माण होतात. त्यांचे आश्रीत बनून काही अधिकारी त्रास देतात असेही होऊ नये. यश आणि प्रतिष्ठा मिळू लागल्यावरही संयमित आचार आणि निस्वार्थी भाव जपून काम करत रहा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. (Memories of Sindhutai)