सौरिष कशेळकर आणि गीत देसाई विजयी
रत्नागिरी : जिल्हा बुद्धिबळ संघटनेमार्फत ओम साई मित्रमंडळ हॉल येथे २० वर्षांखालील (ज्युनिअर गट) निवड स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेचे उदघाटन रत्नागिरीतील बुद्धिबळ प्रशिक्षक व संघटनेचे सहसचिव चैतन्य भिडे आणि आंतरराष्ट्रीय पंच व संघटनेचे सचिव विवेक सोहनी यांनी केले.
कोरोना महामारीनंतर गेल्या दोन वर्षानंतर या पहिल्याच निवड स्पर्धा होत्या. खेड, चिपळूण, देवरुख, संगमेश्वर, राजापूर व रत्नागिरी तालुक्यातून खेळाडूंनी स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. राज्य निवड स्पर्धांचे कॅलेंडर नुकतेच घोषित झाले असल्याने प्रत्येक राज्यनिवड स्पर्धे आधी त्या त्या गटाची जिल्हा निवड स्पर्धा आयोजित करून खेळाडूंना अधिकाधिक सवलती देण्याचा मानस उदघाटनप्रसंगी बोलताना विवेक सोहनी यांनी व्यक्त केला. या स्पर्धेकडे निव्वळ निवड चाचणी म्हणून न बघता गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटात मागे पडलेला पटावरचा सराव या स्पर्धेतून करून घेण्यासाठी खेळाडूंनी प्रयत्नशील राहावे, असे भिडे यांनी याप्रसंगी सांगितले.


२० वर्षांखालील मुलांच्या गटात सौरिष कशेळकर याने निर्विवाद वर्चस्व दाखवत विजेतेपद पटकावले तर देवाशीष पोरे याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सौरिष व देवाशीस यांच्यासोबत विशाल आंबेकर व ऋषिकेश कुंभारे यांची मुलांच्या गटातून जिल्हा संघात निवड करण्यात आली. मुलींच्या गटात गीत देसाई हिने विजेतेपद पटकावले तर मुक्ता सप्रे, निधी मुळ्ये, प्रथमी पित्रे यांना द्वितीय, तृतीय व चौथ्या क्रमांकावर जिल्हा संघात स्थान मिळाले.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार प्रा. मंगेश मोडक तसेच वेदिका मुळ्ये उपस्थित होते. आपण खेळायला खूप उशिरा सुरुवात केली परंतु या साऱ्या लहानग्या मुलांना खेळताना, जिल्हा संघात निवड होताना बघून आनंद होत आहे. या मुलांनी पुढे राज्य व राष्ट्रीय निवड स्पर्धांमध्ये सहभागी होऊन रत्नागिरीचे नाव रोशन करावे, असे प्रा. मोडक यांनी सांगत खेळाडूंना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.