रत्नागिरी :- शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या 23 जून 2021 च्या शासन निर्णयानुसार अनाथांना अनुज्ञेय शिधापत्रिका वितरीत करणेबाबत मार्गदर्शक सूचना देणेत आलेल्या आहेत. शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील 16 डिसेंबर 2021 च्या पत्रान्वये राज्यातील जास्तीत जास्त अनाथांना शिधापत्रिकांचे वितरण व्हावे याकरिता 31 डिसेंबर 2021 पर्यंत विशेष मोहिम राबविण्यांत येत आहे व त्यामध्ये प्रचलित नियमानुसार पडताळणी/तपासणी करुन अनाथांना उचित शिधापत्रिका वितरीत करण्यात येणार आहेत. संबंधितांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे.
१) अनाथांना वयाच्या २८ वर्षापर्यंत तात्पुरती पिवळी (बीपीएल) शिधापत्रिका वितरीत करून प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत लाभ देण्यांत यावा. २८ वर्षावरील अनाथांना उत्पन्नाप्रमाणे अनुज्ञेय शिधापत्रिका च त्यावरील लाभ देण्यांत येतील.
२) संस्थेमध्ये असलेल्या अनाथांना कल्याणकारी संस्था व वसतीगृहे योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ देण्यांत येतो. त्यामुळे सदर लाभ हे संस्थेमध्ये असणाऱ्या अनाथांना अनुज्ञेय असणार नाहीत.
३) अनाथ असल्याचा पुरावा म्हणून महिला व बालविकास विभागाने वितरीत केलेले अनाथ प्रमाणपत्र किंवा आई व वडील यांचे मृत्यू प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा ग्राहय धरण्यात यावा.
(४) ओळखपत्र म्हणून आधारकार्ड/बँक पासबुक/ बालगृह, निरीक्षणगृह अनुरक्षणगृह इ. संस्थांच्या बाबतीत त्या संस्थेच्या अधिक्षकांचे संस्थेत वास्तव्य केल्याबाबतचे प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा आवश्यक आहे.
५) रहिवासासंदर्भात शहरी भगात नगरसेवक व ग्रामीण भागात सरपंच / उपसरपंच यांचे त्या भागातील रहिवासी प्रमाणपत्र ग्राहय धरले जाईल.
६) बहुतांशी अनाथांना वयाच्या २८ वर्षापर्यंत कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने अनाथांकडून वयाच्या २८ वर्षांपर्यंत उत्पन्नाबाबत स्वयंघोषणापत्र घेण्यांत येईल.