गुहागर : महाड येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बहुमजली इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घ्यावे. असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. या आदेशानुसार गुहागर नगरपंचायतीने शहरातील 36 बहुमजली इमारत धारकांना स्ट्रक्चरल ऑडीट करून अहवाल सादर करण्याची नोटीस बजावली आहे. नोटीस मिळाल्यापासून 10 दिवसांत नगरपंचायतीने नेमून दिलेल्या व्यक्तिंकडून हे ऑडिट करुन घ्यायचे आहे.
गुहागर शहरातील 36 बहुमजली इमारतीबरोबर पंचायत समिती इमारतीचेही स्ट्रक्चरल ऑडीट करावे लागणार आहे. बांधकाम विभागाच्यावतीने याची अंमलबजावणी केली जाणार आहे. परवानाधारक अभियंत्यांकडून इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करून त्याचा अहवाल कार्यालयाकडे सादर करावयाचा आहे. यासाठी नगरपंचायतीने त्यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या 5 अभियंत्यांची नावे दिली आहेत. अन्य अभियंत्यांव्दारे ऑडीट करून घ्यावयाचे असल्यास नगरपंचायतीची पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे.
महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिकनगरी अधिनियम 1965 चे कलम 193 व 195 अन्वये स्ट्रक्चरल ऑडीट आवश्यक असून हा संरचनात्मक तपासणी अहवाल सादर न केल्यास भविष्यात होणार्या घटनेची जबाबदारी संबंधित मालकांवर राहिल. असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
गुहागरात शहरात आधीपासून सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई सुरु आहे. त्यातच आता बहुमजली इमारतींना नोटीसा आल्याने शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.