गुहागर तालुका भाजपच्या मागणीला यश
गुहागर : तालुक्यातील भात पिकावरील करपा रोग नियंत्रणात आणण्यासाठी बुरशीनाशक फवारण्याची सूचना व झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली होती. यावर तालुका कृषी अधिकारी अभिजीत गडदे व सहकाऱ्यांनी शेताच्या बांधावर जाऊन तालुक्यातील भात व नाचणी पिकाची पाहणी केली. तसेच आवश्यक त्याठिकाणी बुरशीनाशक औषध फवारणीच्या सूचना शेतकऱ्यांना दिल्या आहेत.
कोरोना संक्रमण काळात मोठ्या प्रमाणात पुण्या – मुंबई व इतर शहरातील चाकरमानी गावात राहिल्याने शेती करण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली. प्रारंभी शेती चांगल्या समाधानकारक स्थीतीत होती. मात्र, पीक हातात येण्याच्या वेळेस भात पिकामध्ये आवश्यक वाढ न होणे, त्यामुळे रोपांवरती धान्य धारणा न होणे, तर काही ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला होता. हीच बाब काही ठीकणी हळव्या नाचणी पिकाचीही दिसत होती. याबाबत गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदनाद्वारे तालुका कृषी अधिकाऱ्यांना याची माहिती तात्काळ देत पिक परीस्थीतीची पाहणी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार कृषी अधिकारी अभिजीत गडदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत तालुक्यातील भातशेती-नाचणी पिकाची पाहणी केली असता नाचणी क्षेत्रांमध्ये जिथे पाऊस मोठ्या प्रमाणात पडला, मात्र पाण्याचा निचरा योग्य न झाल्यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव काही ठिकाणी दिसून आला आहे तर काही ठिकाणी पावसाच्या जास्त प्रमाणामुळे भात पिकाची योग्य ती वाढ झालेली दिसुन आली नसल्याचे सांगितले. आवश्यक त्या ठिकाणी कॉम्बिप्लेन या बुरशीनाशकाची दहा दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी करण्याची सूचना संबंधित शेतकऱ्यांना दिल्या आहेत. यावेळी वेळी मंडल कृषी अधिकारी व्ही.एस.कोळी, आर. के. चोथे, श्रीमती यादव, कृषी पर्यवेक्षक एस.टी. दीडवाघ, एस. बी.चव्हाण, कृषी सेवक व्ही. पी. अंभोरे, श्रीमती भिसे, श्रीमती पवार, एच.डी. सकपाळ हे सर्व कृषी कार्यालयातील कर्मचारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर उपस्थित होते. यांच्यासमवेत काताळे गावात शेत पिकाची पाहणी करतेवेळी नामदेव बारस्कर, भिकू बारस्कर, सुधाकर बारस्कर, दत्तराम कुळे, सुरज बारस्कर,भाजप तालुका चिटणीस मधुकर असगोलकर आदि शेतकरी उपस्थित होते.
यावेळी गुहागर तालुक्यातील सर्व प्रकारातील शेतकरी वर्गाने पीक विम्याचा मोठ्याप्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी अभिजित गडदे यांनी केले. तर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीने शेतकऱ्यांच्या पिकाची अवस्था पाहून पीक पहाणीची व नुकसान भरपाईची केलेली मागणी योग्य असून त्याबद्दल धन्यवाद दिले.