कंगनाच्या वक्तव्यावरून भास्कर जाधवांची भाजपवर जोरदार टीका
गुहागर : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य क्रांतिकारकांनी स्वतःच्या संसारवर तुळशीपत्र ठेवत हसत हसत फासावर जात 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. या सर्व हुतात्म्यांचा अपमान करणाऱ्या कंगना रनौतला दिलेला पुरस्कार हा सरकारने परत घ्यायला हवा होता. पण साधा भाजपकडून निषेधहि नोंदविला गेला नाही. ही बाब शरमेची असून हेच वक्तव्य मुस्लिम धर्माकडून झालं असतं, तर भाजपने देशभरात दंगल घडवून आणल्या असत्या, जाळपोळी केल्या असत्या, विरोध करणाऱ्यांना देशद्रोही म्हटले असते, अशी टीका शिवसेनेचे आ. भास्करराव जाधव यांनी केली.
Numerous revolutionaries on their own world to bring freedom to the country Laughing while holding the basil leaves Going to the gallows, 1947 has given us freedom. This is a matter of shame and if the same statement had been made by the Muslim religion, the BJP would have started riots all over the country, would have set it on fire, the protesters would have been called traitors, said Shiv Sena MLA Bhaskarrao Jadhav.
पालशेत जिल्हा परिषद गटाच्या वतीने आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शृंगारतळी येथील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात आ. जाधव बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. अगदी केंद्र सरकार पासून ते राज्यातील भाजप नेत्यांची व स्थानिक पदाधिकाऱ्यांची नक्कल करून खरपूस समाचार घेतला. त्याला सेनेच्या कार्यकर्त्यांनीही टाळ्या वाजवून दाद दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, तालुकाप्रमुख सचिन बाईत, पंचायत समिती सभापती पूर्वी निमूनकर, जि. प. सदस्य नेत्रा ठाकूर, प्रवीण ओक, महेश नाटेकर, पंचायत समिती सदस्य पांडुरंग कापले, पूनम पाष्ठे, रवींद्र आंबेकर, सुनिल पवार, सरपंच संजय पवार, माजी सभापती विलास वाघे, विनायक मुळे, इम्रान घारे, अमरदीप परचुरे, सचिन जाधव, अनंत चव्हाण, समित घाणेकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1947 रोजी देशाला मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती’ असं वक्तव्य कंगना रनौतने केले होते. त्यावर आ. जाधव यांनी भाजपवर निशाण साधत स्वतःला सावरकरवादी म्हणवणाऱ्या भाजपने किमान सावरकरांबद्दल तरी आस्था बाळगायला हवी होती, असा जोरदार हल्लाबोल केला. क्रांतिकारकांचा अवमान करणाऱ्या कंगना रनौतवर कोणतीही कारवाई झाली नाही. याचा अर्थ कंगना रनौतला हे सगळं बोलण्या करता तर पुरस्कार दिला गेला नाही ना? अशी शंका भास्कर जाधवांनी बोलून दाखवली.
राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन 80 तासांचं सरकार बनवून सर्वात आधी पाठीत खंजीर भाजपने खुपसला होता. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. कुणी धोका दिला तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर देण्याची तयारीही शिवसेनेची आहे, असं जाधव यांनी ठणकावून सांगितलं. डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत राज्य सरकारने घट करावी या भाजपच्या मागणीवर यावेळी त्यांनी राज्यातील भाजप नेत्यावर जोरदार हल्ला केला. ‘केंद्राने जी पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये घट केलीय ती जनतेची कीव आली म्हणून नाही तर आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केली आहे. जर भाजपला केंद्रातून खाली उतरवले तर संपूर्ण महागाई कमी होईल, असे ते म्हणाले. ‘राज्याचे जीएसटीचे 35 हजार कोटी केंद्राने दिले नाहीत. याबद्दल कधी भाजपच्या नेत्यांनी केंद्रात कधी विचारलं का ? राज्यात तौक्ते वादळ आलं, त्यावेळी भाजपच्या मंडळींनी फक्त आरोप केले. मदत काहीच नाही. निसर्ग चक्रीवादळ आलं त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी फक्त टीका केली. मदत काहीच नाही. महापूर आला तेव्हाही या लोकांनी फक्त टीका केली. याचा अर्थ फक्त टीका करायची एवढंच काम भाजपकडे आहे. मदत मात्र काही करायची नाही असा उद्योग या लोकांचा आहे.
गुहागर तालुक्यातील अंध, मतिमंद बुद्धीचे नेतृत्व म्हणाले की, हातबल मातोश्री, लाचार राष्ट्रवादी. मी त्यांना सांगू इच्छितो की, आतापर्यंत गुहागरला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद मिळालेले नव्हते. ते आता विक्रांत जाधवच्या माध्यमातून मिळाले आहे. त्याचे स्वागत खुल्या मनाने केले पाहिजे होते. आम्ही सुद्धा कितीही विरोधक असला तरी त्याचे कौतुक करतो. येत्या निवडणुकीत तुम्ही राष्ट्रवादी सोबत जाता का तेच मला बघायचे आहे, असे सांगत आ. जाधव यांनी डॉ. विनय नातू यांचे नाव न घेता टोला लगावला. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांची आघाडी आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत सेनेसोबत आलात तर खुल्या मनाने स्वागत करू, असे जाधव म्हणाले.
असगोली गावाबाबत जाधव म्हणाले, गुहागर नगरपंचायतीमधून असगोली वेगळे झाले आहे. वेगळे करण्यासाठी साहेबांनी हारतुरे घेतले, मात्र विकासकामांसाठी 1 रुपयाचा निधी दिला नाही. त्यामुळे आज येथील जनता आम्हाला नगरपंचायतीमध्ये सामावून घ्या, असे सांगत आहे. मी असगोलीला नगरपंचयातीमध्ये समाविष्ट करून घेण्यास तयार आहे, पण त्या आधी सर्वांनी चर्चा करून निर्णय घेतला पाहिजे. जो विकास करेल, तो आपला नेता, ते आपले पक्ष. उद्या भास्कर जाधव यांनी काम केले नाही तर मला ही निवडून देऊ नका, असे सांगत येत्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जुना नवा असा वाद बाजूला ठेवून एकदिलाने एकतर्फी भगवा फडकऊया, असे आवाहन आ. जाधव यांनी केले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी वडील भास्करराव जाधव यांनी 2009 पासून गुहागर मतदार संघात केलेल्या विकासकामांबाबत आढावा जनते समोर मांडला. दुर्लक्षित असलेल्या गुहागर तालुक्यात वाडीवस्थीवर विकासगंगा पोहोचवली. साहेबांनी नवी जबाबदारी स्वीकारावी, आम्ही मतदार संघाची जबाबदारी आपल्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने यशस्वी करू, असे त्यांनी सांगितले. तालुकाप्रमुख सचिन बाईत म्हणाले, अवकाळी पावसाने उत्पन्न देणाऱ्या पिकाची मोठी नुकसानी झाली आहे. इथल्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी यासाठी येत्या अधिवेशनात कोकणातील नुकसानीचा विषय मांडावा, असे आ. जाधव यांना सांगितले. पालशेत जिल्हा परिषद गटात आता कोणतेही जुना नवे असे वाद राहिलेले नाहीत. जर असलेच तर मी व जाधव साहेब बसून त्यावर तोडगा कडू, असे म्हणाले. श्री. बाईत यांनी केंद्रातील भाजप सरकारकडून तपास यंत्रणेचा दुरुपयोग केला जात आहे. भाजपच्या नेत्यांवर आरोप असताना साधी चौकशी होत नाही, पण विरोधी पक्षाच्या नेत्यांची चौकशी लावली जाते. खोट्यानाट्या आरोपात अडकविण्याचे प्रकार सुरू आहेत. येत्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या सर्वच उमेदवारांना एकतर्फी निवडून देऊया, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, सभापती पूर्वी निमुनकर, जि. प. सदस्य नेत्रा ठाकूर, प्रवीण ओक, महेश नाटेकर, माजी सभापती सुनिल पवार, विलास वाघे पांडुरंग कापले आदींची भाषणे झाली.