गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील भारतातील सर्वात मोठ्या एकीकृत ऊर्जा संकुल असलेल्या रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रोजेक्टच्या वतीने नेहमीच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ तसेच कर्मचारी वर्ग यांच्यासाठी विविध शैक्षणिक तसेच सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. याच अनुषंगाने लोकांपर्यंत स्वच्छतेचे महत्त्व पोहचवावे, आपला परिसर प्लास्टिक मुक्त करण्याचे आव्हान करावे हे उद्देश समोर ठेऊन रविवार प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री असीम कुमार सामंता यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार श्रीम. प्रतिभा वराळे, गुहागर पोलीस स्टेशनचे निरीक्षक, रानवी ग्रामपंचायतचे सदस्य, सीआईएसएफचे अधिकारी याच्या सहकार्याने आरजीपीपीएलच्या मैत्री क्लबच्या नियोजनाखाली मिनी मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
प्रकल्पाच्या निवासी कॉलनी पासून मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली. गुहागर समुद्रकिनारी समारोप करण्यात आला. या मिनी मॅरेथॉनमध्ये २५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विजेत्या स्पर्धकांना प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री असीम कुमार सामंता व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले. यावेळी श्री असीम कुमार सामंता यांनी गुहागर चौपाटीच्या आजूबाजूच्या दुकानदारांना सुका व ओला कचरा वेगळा करण्यासाठी मोठ्या आकाराच्या कचऱ्याच्या २५ डब्यांचे वाटप केले.
यावेळी बोलताना श्री. सामंता यांनी उपस्थितांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत प्लास्टिक पासून होणाऱ्या दुष्परिणामांपासून अवगत केले. तसेच स्वच्छ, सुंदर व हरित असलेला आपला गुहागर समुद्रकिनारा प्लास्टिक मुक्त ठेवण्याचे आव्हान केले.