गुहागर : सद्या देशात स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झालेली दिसते. अशा घटना रोखण्यासाठी मदतीची याचना करण्यापेक्षा महिलांनी आत्मसंरक्षणाची कला जोपासल्यास अशाप्रकारच्या घटना भविष्यात घडणार नाहीत, असे प्रतिपादन गुहागर तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष भरत शेटे यांनी केले.
Currently, there is a huge increase in the incidence of violence against women in the country. Such incidents will not happen in the future if women cultivate the art of self-defense rather than asking for help to prevent such incidents, said Bharat Shete, president of Guhagar taluka Bhandari Samaj.


रत्नागिरी जिल्हा ज्युदो असोसिएशनच्या मान्यतेने गुहागर येथील भंडारी भवन सभागृहात गुहागर तालुका ज्युदो असोसिएशनच्या वतीने दि. 7 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत बहुविद क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन गुहागर तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष भरत शेटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सद्या माणसाच्या जीवनशैलीत बदल होत चालला आहे. सर्वच क्षेत्रात पुरुषांबरोबर महिलाही बरोबरीने काम करत आहेत. अशावेळी महिलांनी आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आत्मसंरक्षण केले पाहिजे. म्हणजेच कठीण प्रसंगात स्वतःचे संरक्षण आपण सक्षमपणे करू शकतो, असे शेटे यांनी सांगितले.


माजी पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ घुमे यांनी सर्व शिबीरामध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचे कौतुक केले. ज्युदो हा खेळ मान्यता प्राप्त असून या खेळातून तुमचे भविष्य उज्ज्वल होणार आहे. पण, त्याशिवाय या खेळातून तुमची देश सेवाही घडणार आहे. पोलीस खात्यात अशाच खेळातून पुढे आलेले खेळाडू हवे आहेत. वाढलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीशी दोन हात करण्याची धमक या खेळात आहे. त्यामुळे मुलींनीही हा खेळ चांगल्याप्रकारे आत्मसात करून स्वतःचे संरक्षण करावे, असे ते म्हणाले.
या उद्घाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून माजी पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ घुमे, उपमुख्याध्यापक सुधाकर कांबळे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष निलेश गोयथळे, उपाध्यक्ष गणेश धनावडे, सत्यजित पालशेतकर, अनिल कीर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका संघटनेच्या अध्यक्ष सोनाली वरंडे यांनी तर आभार सचिव समीर पवार यांनी मानले.