ना. उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील पर्यटक निवासातील (एमटीडीसी) बांबू हाऊस येथे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले बोट क्लब सुरू करण्यात आले असून या बोट क्लबचे उद्घाटन आज रविवारी सायंकाळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
आता खऱ्या अर्थाने गणपतीपुळे समुद्रात पर्यटकांना वॉटर स्पोर्टचा आनंद लुटता येणार आहे. यावेळी उद्घाटन कार्यक्रमांमध्ये बोलताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, हा नाविन्यपूर्ण उपक्रम असून पाच वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात वेगळेपण घडवून आणायचे होते. मात्र, दोन वर्ष कोरोनाच्या महामारीमध्ये गेली असल्याने आता निर्बंधामध्ये शिथिलता आली असून खऱ्या अर्थाने पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. यावेळी डॉक्टर सारंग कुलकर्णी हे समुद्र तज्ञ देशातील पहिले सागरी विद्यापीठ स्थापन करून इतिहास घडवणार आहेत. या विद्यापीठाची सर्व जबाबदारी सारंग कुलकर्णी हे घेणार आहेत त्याचबरोबर मालगुंड गावांमध्ये येत्या काही दिवसांमध्ये कोकणातील पहिले प्राणी संग्रहालय सुरू करण्यासाठी 50 एकर जमीन अधिग्रहण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या परिसरात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम झाल्यास खर्या अर्थाने पर्यटक या परिसरात थांबणार आहेत. त्यामुळे अनेक स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती बाबू म्हाप, गणपतीपुळे फोटो क्लब चे मुख्य व्यवस्थापक सारंग कुलकर्णी, गणपतीपुळे पर्यटक निवासाचे व्यवस्थापक वैभव पाटील, बोट क्लबचे व्यवस्थापक नुपूर तारी, एमटीडीसीचे माजी व्यवस्थापक दत्तात्रय कुलकर्णी गणपतीपुळेच्या सरपंच कल्पना पक्कये, उपसरपंच महेश केदार, रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी, रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी, मंडळ अधिकारी अधिकारी एस. एस. कांबळे, तलाठी रोहित पाठक आदी उपस्थित होते.