डॉ. नातूंची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी, तालुकानिहाय माहिती देण्यात यावी
गुहागर : रत्नागिरी जिल्ह्यातील कोवीड-19 अंतर्गत आरोग्य विभागातील कामकाजामध्ये सुसूत्रता आणावी. आरोग्य विभागातील अधिकारी कमर्चाऱ्यांना दडपणमुक्त करावे. कोरोना रुग्णांकरीता स्वतंत्र हेल्पलाईन सुरु करण्यात यावी. अशा मागण्या उत्तर रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
आपल्या पत्रात डॉ. नातू म्हणतात की, कोकण आयुक्त रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी दररोज किती चाचण्या केल्या. त्यापैकी कितीजणांचा अहवाल आला. कोरोनाग्रस्त रुग्ण किती. याबाबतची तालुकानिहाय माहिती रोज पत्रकार परिषद घेऊन व माहितीपत्रक काढून प्रसिध्द करावी. अशाप्रकारे चर्चा झाली होती. मात्र दररोज पत्रकार परिषद होत नसल्याने नागरिकांपर्यंत चुकीची माहिती जात आहे. त्यातून गैरसमज होत आहेत. तरी प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय व प्रत्येक नगरपंचायत, नगरपालिकानिहाय सर्व आकडेवारी रोज जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी यांच्या प्रतिनिधींनी प्रसिध्द करावी.
आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना कोवीड-19 च्या परिस्थितीमध्ये दडपणाखाली काम करावे लागणे., ही गंभीर बाब आहे. सर्व आरोग्य कर्मचारी पारदर्शक कारभाराने व दडपणमुक्त काम करत राहिले तर जिल्हामधील नागरिकांना योग्य पध्दतीची रुग्णसेवा मिळू शकेल. जिल्ह्यामधील कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांकरीता आयसीएमआरच्या निकषानुसार शासकीय रुग्णालयांमध्ये, खासगी रुग्णालयांमध्ये व घरगुती उपचारांमध्ये सुस्पष्टता असावी. सर्वांकरीता एकाच प्रकारची नियमावली असण्याची आवश्यकता आहे.
जिल्हा रुग्णालयांमध्ये कोवीड-19 अंतर्गत कोरोना रुग्णांकरीता स्वतंत्र हेल्पलाईन सुरु करण्यात यावी. यामध्ये रुग्णवाहिका सेवा, कोरोना रुग्णांवर उपचार होतात अशा शासकीय व खासगी रुग्णांलयांची माहिती, तेथील जागांची उपलब्धता, अशी माहिती एकत्रित देण्याची व्यवस्था करावी. जिल्ह्यामधील आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व अन्य कर्मचारी यांच्या नेमणुकाबाबत तातडीने कार्यवाही करावी व कामकाजामध्ये सुसूत्रता यावी. अशा विविध मागण्या डॉ. नातूंनी केल्या आहेत.