गुहागर : पत्रकारितेमध्ये प्रत्येक जण विद्यार्थी असतो. पत्रकारिता क्षेत्रातील विविध आयाम लक्षात घेऊन ते आत्मसात केले पाहिजेत. आपला विकास साधण्यासाठी विद्यार्थ्यांनी भौगोलिक चौकट मोडण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन साम टीव्हीचे संपादक प्रसन्न जोशी यांनी केले.
In journalism, everyone is a student. They should be assimilated keeping in mind the various dimensions in the field of journalism. To develop you Students need to break down the geographical framework, asserts Prasanna Joshi, editor of Sam TV.
खरे – ढेरे – भोसले महाविद्यालय गुहागर येथील राज्यशास्त्र विभाग आणि गुहागर न्यूज पोर्टल यांच्या सहकार्याने आयोजित पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या समारोप कार्यक्रमात “पत्रकारितेतील संधी आणि आव्हाने ” या विषयावर बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी कोकणातून बाहेर पडून राज्य व राष्ट्रीय पातळीवर काम करण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन पत्रकारितेमध्ये आले पाहिजे. त्यासाठी मराठी बरोबरच हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महाराष्ट्रातील लोकांनी आपला ठसा इतर प्रांतात उमटवला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले न्यूनगंड बाजूला सरले पाहिजेत, असे मत प्रसन्न जोशी यांनी व्यक्त केले. पत्रकारिता हे पूर्वी ध्येय होते. आता तो व्यवसाय झाला आहे. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी आपली उद्दिष्ट्ये ठरवून काम केले पाहिजे. आज मुद्रित पत्रकारिता क्षेत्राला विविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे. डिजिटल पत्रकारितेच्या आजच्या काळात त्याची कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. या क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव महत्वाचा आहे, हे प्रत्यकाने लक्षात घेतले पाहिजे असे प्रसन्न जोशी यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलताना गुहागर न्यूजचे मयुरेश पाटणकर यांनी सरावाने सर्व गोष्टी साध्य होतात. सोशल मिडीयाचा योग्य आणि प्रभावी वापर केला पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ. अनिल सावंत यांनी असेच नवनवीन अभ्यासक्रम महविद्यालय राविणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विराज महाजन यांनी केले.