श्रम साफल्य ऑरगॅनिक प्रोड्युसर कंपनीचे मोलाचे योगदान
गुहागर : तालुक्यातील तळवली येथे नाचणी पासून विविध पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण नुकतेच उत्साहात पार पडले. एमसीएल संलग्न श्रमसाफल्य ऑरगॅनिक प्रोड्युसर कं. लि. गुहागर आणि एक्सेल इंडस्ट्रीज संचालित श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, लोटे यांच्या संयुक्त विद्यमाने नाचणी पासून विविध पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
Training in making various dishes from Ragi at Talwali was recently passed with enthusiasm. MCL Affiliated Shramasafalya Co. Ltd. Mr. Vivekananda Research and Training Institute, Lotte, run by Guhagar and Excel Industries, jointly imparted training in making various products from ragi.


एमसीएल कंपनीचे प्राईम बी.डी. ए. आणि श्रम साफल्य ऑरगॅनिक प्रोड्युसर कंपनीचे संचालक श्री. श्रीकांत करजावकर यांच्या प्रयत्नाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षण घेण्यासाठी तळवली, निगुंडळ, कारुळ आणि काळसुर कौंढर या गावातील महिला उपस्थित होत्या. महिला विकास महामंडळ अंतर्गत लोक संचालित आधार केंद्र, खेड या संस्थेच्या व्यवस्थापक सौ. दीप्ती सावंत यांच्या नेतृत्वाखाली सदर प्रशिक्षण पार पडले. यामध्ये नाचणी सत्व, चकली, लाडू, शेव, चिवडा, इडली आणि मंचुरीयन इत्यादी पदार्थ नाचणीपासून तयार करण्यात आले.
विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे अधिकारी श्री. शेंडये यांनी महिला सक्षमीकरणात एमसीएल सह श्रम साफल्य कंपनीचे मोलाचे योगदान ठरेल असे प्रतिपादन केले. तसेच श्रम साफल्यचे गुहागर तालुका प्रतिनिधी श्री. संदीप गोरीवले यांनी संपूर्ण तालुक्याच्या विकासाचा चढता आलेख या महिलांच्या सक्षमीकरण आणि आर्थिकदृष्ट्या सबलीकरण करूनच शक्य होईल, असे सूतोवाच काढले.
कंपनीच्या प्रशासकीय सहाय्यक कु. चैताली सोनावणे यांनी पूर्वीच्या काळी नाचणी हे गरिबांचे खाद्य म्हणून म्हटले जात होते. परंतु आज ते श्रीमंतांचे औषध झाले आहे, असा खोचक परंतु विचार करण्यास भाग पाडणारा सल्ला त्यांनी दिला. प्रशिक्षिका सौ. दीप्ती सावंत यांनी नाचणीमध्ये उपलब्ध असलेल्या आरोग्यवर्धक घटकांच्या गुणधर्मामुळे कित्येक आजारांवर मात करता येईल, मधुमेह, रक्तदाब, अस्थीरोग यावर विजय मिळवता येईल असे मार्गदर्शन त्यांनी केले.


विदर्भ कोकण बँक शाखा तळवलीचे व्यवस्थापक श्री. गणेश भुतेकर यांनी महिलांना व्यवसायासाठी आवश्यक कर्जव्यवस्था जेएलजी या नाबार्डच्या योजनेमधून कमी कालावधीत आणि जाचक अटी न ठेवता उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एमसीएल संलग्न श्रम साफल्य ऑरगॅनिक प्रोड्युसर कंपनीचे जनसंपर्क अधिकारी श्री. संजय भागवत यांनी, तर प्रशासकीय अधिकारी श्री. सचिन मोहिते यांनी आभार मानले. सर्व प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी एमसीएल कंपनीचे वरीष्ठ अधिकारी कु. दिनेश कासेकर, श्रम साफल्य कंपनीचे गुहागर तालुका प्रतिनिधी श्री. संदीप गोरीवले, श्री. प्रमोद घुमे, श्री. संतोष घुमे, कृषी समन्वयक श्री. शशिकांत जाधव, श्री. स्वप्नील महाडिक, विदर्भ कोंकण बँकेचे व्यवस्थापक श्री.गणेश भुतेकर आणि सहकारी, श्रम साफल्य कंपनीचे जनसंपर्क अधिकारी श्री. संजय भागवत, प्रशासकीय सहाय्यक चैताली सोनावणे, प्रशासकीय अधिकारी श्री. सचिन मोहिते आदी उपस्थित होते.