गुहागर : तालुक्यातील अडुर व पालशेतमध्ये भर वस्तीमध्ये बिबट्याचा मुक्तसंचार होऊ लागला आहे. यामुळे गेले दोन महिने येथील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे .
वस्तीमध्ये अंगणापर्यंत त्याचा वावर सुरू झाला असून भटक्या कुत्र्यांना भक्ष्य बनवित आहे. यामुळे वनविभागाने बिबट्याला पकडून सुरक्षितस्थळी नेऊन सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तालुक्यातील अडुर येथील ग्रामस्थांनी या अगोदर वनविभागाकडे बिबट्याच्या मुक्त वावराबाबत माहिती दिली होती. वनविभागाच्या वतीने अडुर येथे दोन ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता. परंतु त्या पिंजऱ्यामध्ये तो सापडत नसल्याने पिंजरा पुन्हा चिपळूण येथे पाठवण्यात आला. नुकतेच अडुर ब्राम्हणवाडी येथील ओंकार खरे यांच्या घराच्या अंगणातुन कुत्र्याला पकडून नेल्याची घटना घडली. पालशेत येथेही तोच प्रकार सुरू असून यावर वनविभागाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.