रत्नागिरी- महाराष्ट्रामध्ये साधारणतः ५२ कोटी नारळाच्या फळांचे उत्पादन होते; मात्र मागणी ९८ कोटी नारळ फळांची आहे. महाराष्ट्रात साधारणतः ५० टक्के उत्पादन होते. बाकीची मागणी इतर राज्याकडून आयात केली जाते. यामध्ये सुधारणा करावयाची असल्यास राज्यातील नारळ क्षेत्र वाढले गेले पाहिजे, असे आवाहन प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे प्रमुख व कृषिविदयवेत्ता डॉ. वैभव शिंदे यांनी केले.
भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र आणि रिलायन्स फाउंडेशनच्या यांच्या संयुक्त विद्यमाने नारळ पीक खत व्यवस्थापनाविषयी ऑनलाइन कार्यक्रम घेण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील नारळ उत्पादक , शेतकरी व बागायतदार यांनी उत्स्फूर्त सहभाग लाभला.
डॉ. शिंदे यांनी नारळ लागवडीसाठी लागणारी जमीन, हवामान, जाती, रोपांची निवड, लागवड पद्धती, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, आंतर व मिश्र पिके, कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कोकणातील नारळ लागवडीची सद्यःस्थिती व शेतकऱ्यांची पुढील वाटचाल कशी असावी, याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे निरसन डॉ. शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रम सहायक चिन्मय साळवी यांनी केले. रिलायन्स फाउंडेशनचे रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे यांनी आभार मानले.