ॲड. दीपक पटवर्धन यांची मागणी
रत्नागिरी : लॉकडाऊननंतर आता कोरोना प्रसार कमी होत असताना व्यापारी आस्थापना, व्यवसाय यांना सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत व्यवहारांना परवानगी दिली आहे. मात्र अद्यापही या मर्यादित वेळेत व्यापार उद्योगाला चालना मिळताना दिसत नाही. तसेच ग्राहकांनाही सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत खरेदी करताना कार्यालयीन कामकाजाच्या वेळा सांभाळताना कसरत करावी लागते. त्यामुळे या आस्थापनांना सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास मुभा द्यावी, अशी मागणी रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे.
याबाबत पटवर्धन यांनी भाजपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे ई मेल पाठवला आहे. कार्यालयीन कामाच्या वेळाही सायंकाळी ४.०० वाजता संपतात त्यामुळे खरेदी करतांना अडचणी होत आहेत. प्रामुख्याने शहरी भागातील जनतेची मोठी अडचण होत आहे. तसेच व्यापारी वर्गावरही या वेळेच्या मर्यादेचा अनिष्ठ परिणाम होत आहे. अशा स्थितीत सायंकाळी ४.०० वाजता बंद होणारा व्यापार कार्यालयीन कामकाजाच्या वेळेनंतर किमान ३ तास सुरू ठेवल्यास ग्राहकांना तसेच व्यापाऱ्यांनाही सोयीचे ठरेल. ३ तासाची मर्यादा वाढवून ग्राहकांची सोय व्हावी. तसेच व्यापारातील गिऱ्हाईकांची उलाढाल वाढावी. यासाठी स्थानिक प्रशासनाने साधक-बाधक विचार करून ३ तासांची वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली.
व्यावसायिकांना त्यांच्या आस्थापना सायंकाळी ४.०० वाजता बंद न करता सायंकाळी ७.०० पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे, अशी माहिती ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.