रत्नागिरी – कोरोना महामारीमुळे बंद ठेवण्यात आलेल्या गाड्यांपैकी आणखी चार एक्स्प्रेस गाड्या कोकण रेल्वे मार्गावर पूर्वीप्रमाणेच ११ जुलैपासून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे-एर्नाकुलम साप्ताहिक एक्स्प्रेससह मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसहून मडगाव तसेच कोचुवेली मार्गावर धावणाऱ्या अशा चार गाड्यांचा समावेश आहे.
हळूहळू रेल्वे सेवा पूर्वपदावर येत असतानाचा कोकण रेल्वे मार्गावर ११ जुलैपासून आणखी चार गाड्या पूर्ववत सोडण्यात येणार आहेत. याबाबत कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार पुणे-एर्नाकुलम (०११५०/०११४९) ही गाडी ११ जुलैपासून सुरू होत आहे तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव (०१०८५/०१०८६) आठवड्यातून सोमवार बुधवार अशी दोनदा धावणारी गाडी दि. २ ऑगस्टपासून सुरु होत आहे.
मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी (१०९९/०११००) ही साप्ताहिक एक्स्प्रेस ७ ऑगस्टपासून पुन्हा धावणार आहे. चौथी विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली (०१२१३/०१२१४) दरम्यान दि. ३ ऑगस्टपासून आठवड्यातून दोनदा कोकण रेल्वे मार्गे धावणार आहे.