संभाजी भिडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगीची मागणी
सांगली : गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे अनेक सण-उत्सव कोरोनाच्या सावटाखाली आहेत. अशा परिस्थिती गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही पंढरीची आषाढी वारी कोरोनाच्या सावटात पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी सोहळा रद्द करून याही वर्षी बसमधून वारी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मोजक्या आणि मानाच्या पालख्यांना सरकारने वारीसाठी परवानगी दिली आहे. पण पायी वारी सोहळ्यासाठी वारकरी आग्रही असून याप्रकरणी वारकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता पायी वारी सोहळ्याला परवानगी मिळण्यासाठी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे देखील पुढे आले आहेत. त्यांनी पायी वारीला परवानगी द्यावी अशी मागणी सांगलीचे जिल्ह्याधिकारी अभिजित चौधरी यांच्याकडे केली आहे.
शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांची भेट घेऊन पायी वारीच्या मागणीचे निवदेन दिले आहे. या भेटीदरम्यान नेहमीप्रमाणे संभाजी भिडे यांनी अजब वक्तव्य केले आहे. संभाजी भिडे म्हणाले की, ‘पंढरीची आषाढी वारी झाल्यामुळेच देशातील नव्हे तर जगातील कोरोना आटोक्यात नाही तर नामशेष होईल. संतांच्या परंपरा जपल्या तर हे विघ्य नष्ट होईल. आपल्या सगळ्यांचा वाटतं, कोरोनामुक्त हिंदुस्थान व्हावा आणि ते घटणार. त्यामुळे पायी वारीला परवानगी द्यावी.
यंदा कोरोना अनुषंगाने सर्व १० पालख्यांना वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. यातील देहू आणि आळंदीमधील पालखीच्या प्रस्थानासाठी १०० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. तर उर्वरित ८ पालख्यांना प्रत्येकी ५० लोकांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे. पण या वाऱ्या पायी होणार नसून एसटीने होणार आहे, याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी दिली.