मुंबई : मुंबईत लसीचा पहिला डोस घेतलेल्या १० हजार ५०० जणांना तर लसीचे दोन डोस घेतल्यानंतर २६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणात समोर आले आहे. त्यामुळे लस घेतल्यानंतरही कोरोनाबाबतच्या नियमांचे म्हणजेच त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक झाले आहे. यासंदर्भातील माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्याचप्रमाणे १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम हाती घेतली. २६ जूनपर्यंत मुंबईत कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसीचे एकूण ५० लाख ९३ हजार ४८५ डोस (पहिला व दुसरा डोस) देण्यात आले आहेत. यामध्ये, पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ४१ लाख ७ हजार ५१४ तर दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ९ लाख ८५ हजार ९७१ एवढी आहे.
तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आढळून आलेल्या ३ लाख ९६ हजार बाधित रुग्णांपैकी २६ जणांना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही कोरोनाची बाधा झाल्याचे सर्व्हेक्षणात आढळून आले आहे. तसेच, पहिला डोस घेतल्यानंतरही १० हजार ५०० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे सर्व्हेक्षणात आढळून आले आहे.