सर्वांगीण शिक्षण विकासाबाबत चर्चा
गुहागर : गुहागर पंचायत समितीच्या सभापती पूर्वी निमुणकर यांनी तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधींची सभा गटशिक्षणाधिकारी वामन जगदाळे,विस्तार अधिकारी लीना भागवत,अस्मा पटेल तसेच सर्व केंद्रप्रमुख यांच्या समवेत आयोजित केली होती. दैनंदिन कामकाज करताना शिक्षकांना येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणी तसेच गुहागर तालुक्याच्या गुणवत्ता विकासासाठी कृतिकार्यक्रम निश्चित करणे याच महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग कापले,सदस्य रवींद्र आंबेकर, आबलोली गावचे माजी सरपंच नरेश निमुणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तालुक्याच्या गुणवत्ता विकासासाठी विशेषतः इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भाने अगदी पहिली पासून तयारीसाठी नियोजन करणे, शिक्षकांसाठी भविष्यात कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर एखाद्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करणे, शिक्षकांसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करणे, यासाठी सभापतींच्या अध्यक्षतेखाली सर्व अधिकारी व संघटनेचे अध्यक्ष यांची एक समिती निर्माण करण्याचे निश्चित करण्यात आले.या समितीच्या अंतर्गत विविध उपक्रमांसाठी तज्ञ शिक्षकांच्या सहभागाने विविध समित्या निर्माण करून त्याद्वारे उपक्रम आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.यामध्ये प्रथम इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भात समिती स्थापन करून तज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून इयत्ता पाचवीला शिकवणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे ठरविण्यात आले.तसेच दोन सराव परीक्षा तालुका स्तरावरून घेण्याचे निश्चित करण्यात आले.यावेळी संघटना अध्यक्ष यांनी शिक्षकांच्या विविध अडचणी बाबत सभापती व गटशिक्षणाधिकारी यांच्यासमवेत चर्चा केली.यामध्ये शिक्षकांकडून शालेय माहिती मागवताना घाई केली जाणार नाही. माहिती देण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल.आरोग्य केंद्रावरील ड्युटी करताना रमजान काळात उर्दू शिक्षकांना नेमणुका दिल्या जाणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल असेही सांगण्यात आले. शिक्षकांचे प्रा.फंड हिशोब व त्यामध्ये असलेल्या काही चुका यांच्या दुरुस्तीबाबत तसेच प्रा.फंड रकमेबाबत जिल्हास्तरावर शिक्षकांनी दिलेले प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करणे संदर्भाने जिल्हा स्तरावर चौकशी करण्याचे आश्वासन सभापतींनी दिले.
बाल संगोपन रजेबाबत जिल्हास्तरावरून लवकरात लवकर मार्गदर्शन मागवले जाईल असेही यावेळी सांगण्यात आले.ज्या शाळांना लाईटबील खूपच जास्त आलेले आहे आणि शाळा अनुदान व ४% सादील अनुदान रक्कम पुरेशी पडत नसेल त्यांनी लवकरात लवकर प्रस्ताव गशिअ कार्यालयाकडे देणे. सदर जादाची रक्कम ग्रामपंचायत कडून मिळणेसाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीना सूचना करण्यात येईल असे गटशिक्षणाधिकारी यांनी सांगितले.
मागील वर्षांपर्यंत अप्राप्त सर्व शिष्यवृत्त्यांची रक्कम लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणेसाठी जि.प.कडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन सभापती पुर्वी निमुणकर यांनी दिले. उन्हाळी सुट्टी बाबत अजूनही काही सूचना आलेल्या नसल्यातरी सुट्टी मध्ये स्वगावी जाणाऱ्या शिक्षकांची आताच कोरोना ड्युटी पूर्ण करून घ्यावी. शक्यतो उन्हाळी सुट्टी मध्ये स्थानिक शिक्षकांना ड्युटी काढली जावी,अशा प्रकारची विनंती संघटनेतर्फे करण्यात आली. यावेळी गटशिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत नियोजन करून कार्यवाही केली तर भविष्यात उत्तम निकाल आपणास मिळेल असे सांगितले.
तालुक्यातील सर्व शिक्षकांनी या गुणवत्ता विकासासाठी जबाबदारीने अत्यंत मेहनत घेऊन तालुक्याचा स्पर्धा परीक्षातील टक्का वाढविण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन यावेळी सभापती पूर्वी निमुणकर यांनी केले. आपण स्वतः एक शिक्षक आहोत आणि शिक्षकांविषयी आपणास आदर आहे त्यामुळे शिक्षकांच्या कोणत्याही प्रकारच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध राहू असे आश्वासनही यावेळी सभापतींनी दिले.