नासीम मालाणी यांचा गरीब कुटुंबाला मदतीचा हात
गुहागर : वरवेली येथील एका गरीब कुटुंबातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने ही व्यक्ती पूर्णपणे घाबरून गेली होती. हातावर पोट असल्याने आता आपल्या कुटुंबाचे कसे होणार या विवंचनेत असलेल्या या कोरोनग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबाला शृंगारतळी येथील प्रसिद्ध व्यापारी आणि प्रत्येक सामाजिक कार्यात पुढे असणाऱ्या नासीम मालाणी यांनी धीर देत त्यांच्या कुटुंबाला महिनाभर पुरेल इतके जिन्नस घरपोच केले. नासीम मालाणी यांच्या या दानशूरपणाचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.
गुहागर तालुक्यात प्रत्येक सामाजिक उपक्रमात मालाणी कुटुंबाचे योगदान राहिले आहे. दुष्काळग्रस्त भागात जाऊन आवश्यक वस्तूंचे वितरण केले आहे. तालुक्यातील सर्वच जाती धर्मातील नागरिकांना त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. पहिल्या लॉकडाऊन तालुक्यात अडकून पडलेल्या नागरिकांना व गोरगरीब कुटुंबाला मालाणी यांनी मदत केली आहे.
रविवारी ४ एप्रिल रोजी गुहागर येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या गरीब कुटुंबातील व्यक्तीला अचानक ताप आला. ताप आल्याने गुहागर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेले असता त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सदरील व्यक्ती अक्षरशः घाबरून गेली. या व्यक्तीची ही परिस्थिती पाहून येथील डॉक्टर, नर्स व ग्रामस्थ यांनी धीर दिला.
या व्यक्तीची घरची परिस्थिती अत्यंत बेताच आहे. घरात एकटा कमविणार आणि घरी पाच माणसे असल्याने आता घरीच बसावे लागणार होते. तसेच या कालावधीत मला व माझ्या कुटुंबाला खायला काय मिळणार हा प्रश्न सतत त्यांच्यासमोर होता. काही दिवसापूर्वीच कमी पगाराची नोकरी मिळाली होती. मोजक्याच पगाराच्या नोकरीसाठी दररोज जाण्या-येण्यासाठी एसटी बसला देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसायचे. त्यातच घरी पत्नी, दोन लहान मुले, आई,भाऊ असे कुटुंब आहे. पूर्ण कुटुंबच गृह विलगीकरण करण्यात आले. पूर्ण कुटुंब समोर आर्थिक समस्या निर्माण झाली. घरी असलेल्या जीवनावश्यक वस्तू ही संपून गेल्या. घरी लहान मुलांची उपासमार सुरू झाली. वाडीतील लोक व नातेवाईक यांनी थोडीफार अन्नधान्याची मदत केली. परंतु ती अपुरी पडत होती. या कुटुंबाची ही अवस्था शुंगारतळी येथील उद्योजक नासिमशेठ मालाणी यांना समजली. त्यांनी लगेच त्या कुटुंबाशी मोबाईलद्वारे संपर्क साधला व धीर दिला. तुम्ही काळजी करू नका. असे सांगून मालाणी यांनी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू देण्याची हमी दिली व लगेच खाजगी वाहनाने जीवनावश्यक वस्तूंचा साठा त्यांच्या घरपोच केला. तोही अगदी १५ ते २० दिवस पुरेल इतका. आज या कोरोनग्रस्त व्यक्तीचे कुटुंब मालाणी यांच्या मदतीमुळे निर्धास्त झाले आहे.