गुहागर:गुहागर तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे. अनेक गावातील जंगले ओसाड पडत आहेत. त्यामुळे जंगली जनावरे लोकवस्तीकडे वळली आहेत. त्यातच वानरांनी अक्षरशः लोकवस्तीत धुमाकूळ घातला आहे. वानरांच्या टोळीच्या टोळी लोकवस्तीत शिरत असून घरावर उड्या मारत आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे, कौले फूटून नुकसान होत असल्याने पाटपन्हाळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच येथील प्रत्येकाच्या घरासमोरील परसबागेत चिकू, पपई, पेरु, केळी अशा फळांची झाडे आहेत. बागेत असलेल्या फळांची व भाजीपाल्याचे हे वानर एकजूटीने जाऊन नुकसान करत आहेत.
यावर्षी आंब्याचे प्रमाण फारच कमी आहे. त्यातच आंबा बागायतीमध्ये वानरांची टोळीच्या टोळी घुसत असून एका कलमावरून दुसऱ्या कलमावर उड्या मारीत असल्याने काही कलमांवर असलेला आंबा खाली पाडत आहेत. कलमाच्या फांद्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. येथील ग्रामस्थ वानरांना पळवून लावण्यासाठी फटाके लावतात. मात्र हे वानर फटाक्याच्या आवाजालाही घाबरत नाहीत. हे वानर पळवून लावणाऱ्यांच्या अंगावर खेकसतात तसेच अंगावर धावून येतात. त्यामुळे महिलावर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.