शासनाच्या निर्णयाचा निषेध
गुहागर : राज्यात मिनी लॉकडाऊनच्या आदेशाने शृंगारतळी बाजारपेठ मंगळवारपासून पोलिस प्रशासनाने सक्तीने दुकाने बंद करण्यास लावल्याने व्यापारी वर्गामध्ये नाराजी पसरली आहे. या लॉकडाऊनला येथील सर्व व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. तसेच शासनाच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त करुन याबाबतचे निवेदन तहसीलदार लता धोत्रे यांना दिले आहे.
कोरोनाच्या वाढत्या पादुर्भावामुळे संपूर्ण राज्यात शासनाने मिनी लॉकडाऊन जाहिर केले आहे. या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका व्यापारी वर्गाला बसत आहे. या लॉकडाऊनबाबत शृंगारतळीतील व्यापाऱ्यांशी झालेल्या बैठकीत तहसीलदार व पोलिस प्रशासनाने लॉकडाऊन संदर्भात कडक अंमलबजावणी करण्यासंदर्भात शासनाचे आदेश चाचून दाखवले. याला व्यापारी वर्गाने विरोध केला आहे. अत्यावश्यक दुकान वगळून बाकी सर्व दुकाने बंद ठेवा याचा व्यापारी संघटनेने निषेध केला आहे. एकप्रकारे व्यापारी वर्गामध्ये वाद लावण्याचा प्रकार होत आहे. याच्या निषेधार्थ व्यापारी संघटनेने शुक्रवारी दि. ९ रोजी संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली होती. सर्वच व्यापाऱ्यांना परवानगी द्या, त्यांच्यावर अन्याय नको, आम्ही आमच्या बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही, असा इशारा व्यापारी संघटनेने शासनाला दिला आहे.
याबाबत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजित बेलवलकर यांनी सांगितले. राज्य शासनाने नव्याने जाहीर केलेल्या लॉकडाऊनला शृंगारतळी येथील व्यापारी वर्गाने विरोध केला आहे. आधीच लॉकडाऊनमुळे कर्जाच्या ओझ्याखाली गेलेला व्यापारी वर्ग नव्या संकटात सापडला आहे. बाजारपेठ बंद ठेवण्याची सक्ती केल्याचा निषेध आम्ही करतो असे ते म्हणाले.
यावेळी निवेदन देण्यासाठी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजित बेलवलकर, प्रसाद संसारे, अल्ताफ मालाणी, गणेश संसारे, विशाल बेलवलकर आदि उपस्थित होते.