ठेकेदाराचा मनमानी कारभार; ग्रामस्थांची तहसीलदारांकडे तक्रार
गुहागर : तालुक्यातील पडवे गावात सुमारे १ कोटी ८७ लाख ३७२०० रूपये खर्चुन राष्ट्रीय पेयजल योजनेतून नळपाणी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या शुभारंभपासून काम वादात सापडले आहे. गावाला पाण्याची अत्यंत गरज असताना ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे योजनेचे काम रखडले आहे. या योजनेचे काम निकृष्ठ दर्जाचे सुरु असून जागा मालकाची परवानगी न घेता त्यांच्या जागेत पंप हाऊस व साठवण टाकी बांधण्याचा पराक्रम संबंधित ठेकेदाराने केला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून या योजनेचे दर्जात्मक व पारदर्शपणे काम व्हावे आणि संबंधित योजनेचे काम निकृष्ठ पध्दतीने करणाऱ्या ठेकेदाराला काळा यादीत टाकावे, अशी मागणी पडवे ग्रामस्थांनी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पडवे गावात राष्ट्रीय पेयजल योजनेतून नळपाणी सन २०१५ १६ प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. २७ ऑगस्ट २०१३ रोजी तांत्रिक मान्यता मिळून याचा ठेका वर्धा प्रोजेक्ट गणेश नगर ता. दापोली याचेकडून आजपर्यंत झालेले काम हे पूर्व परवानगी घेतलेल्या मंगेश मुरलीधर सुर्वे यांच्या मालकीच्या सर्वे नंबर २०/१३ या जागेवर मंजूर आहे. तसे बक्षीसपत्र होवून तसा तुकडा पडून सर्वे नंबर २०/१३/१/२ असा स्वतंत्र नोंदीचा ७/१२ तयार झाला आहे. असे असताना तत्कालीन ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पाणी कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संबंधित अधिकारी वर्ग यांनी ठेकेदाराचे हित जपत शेजारील जागा मालक शशिकांत पांडुरंग गडदे सर्वे नंबर २०/१४ या जागेतून राबविला असून आज दोन वर्षे उलटून गेली तरी बक्षिसपत्र न झालेल्या जागेवर पंपहाऊस, साठवण टाकी बांधली गेली आहे. सदर जागेत सहहिस्सेदार असल्याची कल्पना ग्रा.पं. सदस्य गजानन यशवंत गडदे यानी त्यावेळेचे राष्ट्रीय पेयजल योजनेचे उपअभियंता, जि. प. रत्नागिरी ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता, गुहागर ग्रामीण पुरवठा जि.प. उपविभाग उप उपअभियता यांनाअर्जाव्दारे कळवून कामविनापरवाना चालू आहे व भविष्यात येणारे जागा मालकांचे अडथळे आणि ठेकेदाराने चालविलेली मनमानी, कामातील दिरंगाई तसेच शासनाची परवानगी न घेता नदीच्या पात्रात खोदलेली विहिर या गोष्टीची लेखी माहिती देवूनहि प्रत्यक्ष पाहणी करून ठेकेदाराची देयके थांबविण्याची विनंती केली होती. परंतु, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
दरम्यान, गुहागर ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंत्यांना ३२ जमीन मालकांच्या सहीचे निवेदन तत्कालीन जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना गजानन गडदे, सुभाष कोळवणकर, विनायक सुर्वे, सुमेध सुर्वे, महेश गडदे, सुजेंद्र सुर्वे यांनी देत या विषयाबाबत चर्चा करण्यात आली. झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे तसेच पाण्याच्या टाकीच्या जागेचे व वितरीत होणाऱ्या जलवाहिन्यांचे लाईन आउट (नकाशा) प्रमाणे ७/१२ सहीत मालकांचे संमतीपत्र घेण्यात यावेत तोपर्यंत काम बंद ठेवण्यात यावे आणि मक्तेदाराला झाल्या कामाचे बिल अदा करण्यात येवू नये असे ठरले. परंत, सतत निवेदने, बैठका होऊनहि याबाबत निर्णय काही होऊ शकला नाही.
नुकतेच निवडून आलेले निर्मल ग्रामपंचायत पडवेचे सरपंच गुजीब हुसेन जांभारकर, उपसरपंच मानसी विनायक सुर्वे आणि सहकारी सदस्य व पाणी कमिटी अध्यक्षा उपाध्यक्ष व सहकारी नजीर जांभारकर यांनी जागा मालकांना पूर्व सुचना न देता ठेकेदाराच्या मदतीने काम सुरु केले आहे. दिलेल्या नकाशानुसार काम न करता नुकत्याच वर्षापूर्वी बांधलेल्या चौदावा वित्त आयोगातील पाखाड्या तोडून काम केले जात आहे. मंजूर असलेली योजना भंडारवाडा, वरचा मोहल्ला, मधला मोहल्ला व खालचा मोहल्ला अशा चार प्रभागाला पोहोचणे शक्य नाही. तेव्हा जुन्या नळपाणी योजनेलाही नवीन पाईपलाईन जोडून ५० ते ६० लाखाचा अपहार होण्याची शक्यता आहे. या योजनेचे संपूर्ण काम निकृष्ठ दर्जाचे असून जागा मालकांना फसवून काही ठराविक पदाधिकारी ग्रामपंचायत, तसेच पाणी खात्याचे संबंधित अधिकारी या ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या निवेदनावर सुमेध सुर्वे, सुजेंद्र सुर्वे, गजानन गडदे, सुभाष कोळवणकर, विनायक सुर्वे यांच्या सह्या आहेत.