प्राथमिक चाचपणी सुरू
गुहागर : सावर्डे येथून सातारा जिल्ह्याला जोडणार्या नव्या मार्गाची चाचपणी सुरू झाली आहे. दुर्गेवाडी येथून मंजुत्रीमार्गे पाटणपर्यंत हा रस्ता नेण्यात येणार असून यामुळे रत्नागिरी परिसरातील लोकांना सातार्यामध्ये जाणे सोयीचे ठरणार आहे.
जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे तीन महत्त्वाचे घाट आहेत. यामध्ये कुंभार्ली घाट, आंबा घाट व अणुस्कुरा घाटाचा समावेश होतो. आंबा व अणुस्कुरा घाटातून रत्नागिरीतील वाहने पश्चिम महाराष्ट्राकडे ये-जा करतात तर कुंभार्ली घाटातून उत्तर रत्नागिरीतील वाहने पश्चिम महाराष्ट्रात ये-जा करतात. याआधी कुंडी घाटातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणार्या चौथ्या मार्गाचा प्रस्ताव तयार झाला आहे. त्यासाठी आर्थिक तरतूद देखील करण्यात आली आहे. काजिर्ड्यातूनही कोल्हापूर जोडणे शक्य आहे.
आता पश्चिम महाराष्ट्राला जोडणार्या सहाव्या मार्गासाठी सावर्डेमार्गे प्राथमिक चाचपणी सुरू झाली आहे. खेडमधून रघुवीर घाटमार्गे सातारा जिल्ह्यात जाता येते. मात्र, कोयनेच्या बॅकवॉटरमुळे त्याला ब्रेक लागतो. होडीतून गेल्यास तापोळा मार्गे सातार्यात जाता येऊ शकते.
याशिवाय मुंबई-गोवा महामार्गावरून डेरवण फाट्याकडे जाणार्या रस्त्याने हा सहावा मार्ग तयार करणे शक्य आहे. सावर्डे ते दुर्गेेवाडीपर्यंत सा. बां. खात्यांतर्गत रस्ता आहे. त्यानंतर पुढे हा रस्ता मंजुत्री या छोटेखानी गावात जातो. दुर्गेवाडी ते मंजुत्री हा रस्ता अजूनही जि.प.कडे आहे. मंजुत्रीनंतर सह्याद्रीच्या पायथ्यापासून पुढे गेल्यास सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका लागून आहे. पूर्वी येथील ग्रामस्थ दुर्गेवाडी, मंजुत्रीमधून पाटणमध्येच बाजार खरेदी करण्यासाठी जात असत. चालत जाऊन बाजार खरेदी होत असे. मात्र, आता रस्तेमार्ग निर्माण झाल्याने सर्व व्यवहार चिपळूण व सावर्डेतून होत आहेत.
मध्यंतरी जिंदाल कंपनीच्या माध्यमातून या भागात टॉवरचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे या कंपनीने मंजुत्रीच्या पुढे आपली वाहने जातील अशा पद्धतीने कच्चा रस्ता निर्माण केला आहे. परंतु हा रस्ता अजूनही पाटणपर्यंत मिळालेला नाही. सावर्डेपासून दुर्गेवाडी 18 कि.मी. असून त्यापुढे पाटण सुमारे 40 ते 45 कि.मी. आहे. त्यामुळे सावर्डेतून थेट पाटणकडे जाणे शक्य होणार आहे. हा रस्ता मार्गी लागल्यास रत्नागिरी जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा सहावा मार्ग निर्माण होणार आहे. त्या दृष्टीने दुर्गेवाडी, सावर्डे परिसरातील ग्रामस्थ मागणी करीत आहेत. या मार्गामुळे परिसरातील गावांच्या विकासाला चालना मिळणार असून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा मार्ग निर्माण होणार आहे. त्यामुळे लवकरच येथील ग्रामस्थ आ. शेखर निकम यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा करणार आहेत.