गुहागर : तालुक्यातील आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्र येथे विविध प्रात्यक्षिकांद्वारे व्यावसायिक हळद लागवड प्रशिक्षण देण्यात आले. आबलोली येथील प्रगतिशील शेतकरी सचिन कारेकर यांनी विकसित केलेल्या स्पेशल कोकण-४ या हळद पिकाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणाचे प्रास्ताविकात विशाल पाटील यांनी हळद प्रशिक्षणाची गरज याविषयी मार्गदर्शन केले. गेली वीस वर्षे हळद पिकाबाबात विविध यशस्वी प्रयोग करणारे सचिन कारेकर यांनी प्रत्यक्ष शेतात हळद लागवड, त्याचे नियोजन, पाणी व्यवस्थापन, पिकाला पुरण-बेनणी, कीटकनाशक – तणनाशकाचा वापर याबाबत सखोल मार्गदर्शन केले. हळद पीक हे आंतरपीक म्हणून घेतल्यास शेतकऱ्याची आर्थिक उन्नती होऊ शकते तसेच माकड, वानर, डुक्कर आदी जंगली प्राण्यांचा हळद पिकाला उपद्रव होत नसल्याने या पिकाकडे शेतकऱ्यांनी प्राधान्याने लक्ष द्यावे असे आवाहन सचिन कारेकर यांनी केले. गजेंद्र पौणीकर यांनी हळद कंदापासून रोप निर्मिती, रोपांची घ्यावयाची काळजी या बाबत मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित शेतकऱ्यांचे शंका निरसन केले. यावेळी गुहागर परिसरातील शेतकरी उपस्थित होते.