ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार ; पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित
गुहागर : तालुक्यातील आरजीपीपीएल कंपनीमुळे अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील नैसर्गिक पाण्याचे झरे, विहिरी क्षारयुक्त आणि प्रदूषित झाल्या आहेत. यामुळे पिण्याचे पाणी खारट आणि मचूळ अशा स्वरूपाची झाली असून सदरचे पाणी पिण्यास धोक्याचे बनले आहे. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
कंपनी आवारातील पाईपलाईन फुटल्यामुळे, त्याचप्रमाणे कुलिंग टॉवरमध्ये शितलीकरणासाठी वापरण्यात येणारे समुद्राचे क्षारयुक्त पाणी अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील डोंगर उतारावर असलेल्या नैसर्गिक गोड्या पाण्याचे झरे आणि विहिरी यामध्ये झिरपल्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून हे नैसर्गिक जलस्त्रोत प्रदूषित झाले आहेत. या पाण्याची चव खारट आणि मचूळ अशा स्वरुपाची झाली आहे. हे पाणी पिण्यास खूपच त्रासदायक होत आहे. नैसर्गिकरित्या पाण्यातील क्षार अथव मचूळपणा निघून जाईल याबाबत गेले पन्नास दिवस वाट पाहिली, परंतु अद्याप हे नैसर्गिक जलस्त्रोत पूर्ववत झालेले नाहीत. सदर पाणी प्यायल्याने आता साथीचे रोग पसरण्याची भिती निर्माण झाली आहे. सगळीकडे कोविड-१९ परिस्थिती असताना सदर प्रदूषित पाणी प्यायल्याने आमच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
याबाबत तातडीने पाणी प्रदूषणाबाबतची योग्य ती अधिकृत चाचणी करून सदरच्या अहवालाची प्रत आम्हाला पाठवावी. तसेच तातडीने उपाययोजना करुन कंपनी अंतर्गत नादुरुस्त, फुटक्या जलवाहिन्या, कुलिंग टॉवरचे शितलीकरणाचे क्षारयुक्त पाण्याचे वाहते विस्कळीत प्रवाह याचा तातडीने शोध घेऊन ते दुरुस्त करावेत, असे पत्रही हे रत्नागिरी गॅस अॅण्ड पॉवर लिमिटेड कंपनी व्यवस्थापनाला दिले आहे.
कंपनी मधून येणारे क्षारयुक्त प्रदूषित पाणी डोंगर उतारावरुन विहिरी झरे यांच्यामध्ये मिसळत आहे ते तातडीने बंद करावे. याची दुरुस्ती न केल्यास क्षारयुक्त प्रदूषित पाणी येणे बंद होणे शक्य नाही. या प्रदूषणामुळे प्रभावित झालेल्या सर्व घरांना कंपनी कडून लवकरात लवकर शुध्द गोड्या पाण्याचा पुरवठा केला जावा.अशी मागणी ग्रामस्थांनी रत्नागिरी गॅस अॅण्ड पॉवर लिमिटेड या कंपनीकडे केली आहे. यापूर्वीही 1999 मध्ये येथील पाणी अशाच प्रकारे प्रदुषित झाले होते.