गुहागर : घरातून सायकल घेऊन बेपत्ता झालेला तालुक्यातील देवघर येथे राहणारा अथर्व गोंधळेकर हा गुजरातमधील व्दारका येथील मंदिरात सापडून आला आहे. येथील मंदिर व्यवस्थापनाने त्याला आपल्या ताब्यात ठेवले असून अथर्वचे आईवडील त्याला आणण्यासाठी गुजरातला रवाना झाले आहेत.
देवघर भाग्यनगर येथे राहणारे जितेंद्र रामदास गोंधळेकर सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत. सध्या ते आरजीपीपीएल वसाहतीच्या सुरक्षा व्यवस्थेत अधिकारी म्हणून काम करतात. इयत्ता बारावीमध्ये शिकणारा त्यांचा मुलगा अथर्व अभ्यासात हुशार होता. ३१ मार्च २०२१ ला पहाटे ३ वा. अथर्व सायकल घेवून घरातून बाहेर पडला होता. घरातील मंडळींना वाटले की, अधर्व फेरफटका मारून पुन्हा घरी येईल. त्यामुळे त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. मात्र सकाळी १० वाजेपर्यंत घरी आला नाही. तेव्हा सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. अथर्वचे घरातील कोणत्याच व्यक्तीचा वाद,भांडण झाले नव्हते. अभ्यासावरूनही त्याला कोणी रागावले नव्हते. अथर्व हा कृष्णभक्त होता. लहानपणापासूनच त्याला जप करणे, धार्मिक ग्रंथ वाचणे याची ओढ आहे. अर्थव घरी न परतल्याने वडिलांनी अथर्व बेपत्ता झाल्याची तक्रार गुहागर पोलिस ठाण्यात केली होती.
अथर्वकडे जाताना सायकल, जप माळ, पोती, श्रीकृष्ण मुर्ती व बसायचे आसन आणि पैसे होते. अथर्व हा ३१ रोजी सकाळी ६.३० ते ७ या दरम्यान दाभोळ – धोपावे फेरीबोटीतून जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला होता. त्यानंतर तो दाभोळ किंवा दापोलीत गेला असावा असे त्याच्या नातेवाईकांनी अंदाज काढला.
दरम्यान, अथर्व हा गुजरात द्वारका येथील इस्कॉन मंदिरात भक्तीत लीन होता. मंदिर व्यवस्थापनाला अथर्व दिसताच त्याची विचारपूस केली असता त्याने रत्नागिरी जिल्हयातील गुहागर तालुक्यातील देवघर येथून घरी कोणालाहि न सांगता आल्याचे सांगितले. त्यावर मंदिर व्यवस्थापनाने लगेचच त्याच्या आईशी मोबाईलवरुन संपर्क साधून आपला मुलगा आमच्या येथे असल्याचे कळविले. अथर्वला आणण्यासाठी आईवडील गुजरातला रवाना झाले आहेत.