गुहागर : महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये एकाच टर्म मध्ये जिल्हा परिषद विरोधी पक्षनेता पद आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद आजपर्यंत कुणालाही मिळालेले नाही. परंतु सर्वांच्या सहकार्यामुळे हि दोन्ही पदे मिळण्याचे भाग्य मला लाभले असल्याचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी सांगितले. गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह मध्ये आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, युवानेते व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत, आमदार भास्करशेठ जाधव यांनी मला माझ्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून संधी दिली. पुढील दहा महिन्याच्या कालावधीत विकास कामांच्या माध्यमातून जनतेची सेवा करणार आहे. मी लहान असतानाच माझे वडील जि. प. चे विरोधी पक्षनेते होते. त्यामुळे लहानपणापासूनच राजकारणाचे बाळकडू मला वडिलांकडून प्राप्त झाले. गुहागर तालुक्याच्या सभापती पूर्वी निमुणकर यांनी गुहागर तालुक्याला जास्तीत जास्त निधी देण्याचे मागणी केली आहे,आता तर जि. प. चे अध्यक्षपद गुहागरला मिळाले असून तालुक्याच्या विकास कामांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून केला जाईल. तसेच अधिकचा निधी तालुक्याला देऊन गुहागर तालुका जिल्ह्यामध्ये विकास कामाच्या बाबतीत नक्कीच अग्रेसर नेण्याचा प्रयत्न असेल असे जाधव म्हणाले.
तसेच जनहितासाठी कितीही मोठा व टोकाचा निर्णय घेण्याची वेळ आली किंवा प्रसंग आला तरी तो मी नक्की घेईन याची खात्री यावेळी विक्रांत जाधव यांनी दिली. तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी मी तालुका प्रमुख झाल्यापासून गुहागर तालुक्यामध्ये शिवसेनेमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. सुरुवातीला भास्कर जाधव यांच्या रूपाने गुहागर तालुक्याला शिवसेनेचा आमदार मिळाला. शिवसेनेचे दोन सदस्य निवडून येऊन सुद्धा पंचायत समितीच्या सभापती पदी पूर्वी निमुणकर या शिवसेनेच्या सभापती झाल्या. त्यानंतर विक्रांत जाधव यांच्या रूपाने तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान मिळाला. सभापती पूर्वी निमुणकर यांनी गुहागर तालुक्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी जास्तीत जास्त निधी द्यावा अशी मागणी केली.
यावेळी तालुकाप्रमुख सचिन बाईत, सभापती पूर्वी निमुणकर, माजी सभापती सुनिल पवार, ज्येष्ठ शिवसैनिक विनायक मुळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा खेतले, जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, प्रवीण ओक, प.स सदस्य सीताराम ठोंबरे,पुनम पास्टे, सरपंच संजय पवार , उपतालुकाप्रमुख नारायण गुरव, सरपंच बाबू सावंत, शहर प्रमुख नरेश पवार, रत्नागिरी जिल्हा लाकूड व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष इम्रान घारे, अमरनाथ मोहिते, तानाजी चव्हाण, अनंत चव्हाण, सत्यप्रकाश चव्हाण, स्वप्निल बारगोडे, युवासेना तालुका अधिकारी अमरदीप परचुरे आदी उपस्थित होते.