गुहागर : महिला दिन सप्ताहाचे औचित्य साधून जिल्हा परिषद आदर्श शाळा कुंडली नंबर 3 माटलवाडी तालुका गुहागर या शाळेत शाळा व्यवस्थापन समितीतर्फे गावातील कर्तुत्ववान महिला व आदर्श मातांचा सन्मान सरपंच सौ. चैतन्या शेट्ये ,उपसरपंच संतोष पावरी, माजी उपसरपंच पांडुरंग थोरसे, ग्रा.पं. सदस्य नितीन गावनंग व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती महिला मुक्तीदात्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर शाळेचे मुख्याध्यापक सुहास गायकवाड यांनी आजच्या कार्यक्रमाविषयी तसेच महिला दिन सप्ताहाच्या निमित्ताने राबविलेल्या विविध उपक्रमांविषयी माहिती आपल्या प्रास्ताविकेतून दिली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान पुष्पगुच्छ व वाचनीय पुस्तक भेट देऊन करण्यात आला.यामध्ये गावच्या नवनिर्वाचित सरपंच चैतन्या शेट्ये, ग्रा.पं. सदस्या प्रतिक्षा किल्लेकर, योगिता जोशी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा निकिता ठोंबरे, शाळेच्या पदवीधर शिक्षिका प्रमोदिनी गायकवाड, आशा सेविका उर्मिला ठोंबरे, अंगणवाडी सेविका सुनिता माटल, मदतनीस प्राजक्ता माटल, मीरावती ठोंबरे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.यानंतर पदवीधर शिक्षिका प्रमोदिनी गायकवाड यांनी महिला दिनानिमित्त महिला वर्ग व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी महिला दिनाचे महत्व तसेच देशातील कर्तुत्ववान महिलांनी देशासाठी केलेले कार्य याची माहिती दिली. कुडली ग्रा.पं. सरपंच चैतन्या शेट्टी यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगण्याबरोबरच महिलांचा कुटुंबाच्याच नव्हे तर देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असल्याचे त्यांनी अनेक उदाहरणाद्वारे पटवून दिले. तसेच आपल्या गावातील सर्व महिलांनी सर्व प्रकारची बंधने झुगारून स्वयं विकासासाठी पुढे येण्याचे आवाहन केले तसेच आपल्या मुलींना उच्च शिक्षण देण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संदेश सावंत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक गणेश वायचाळ यांनी मेहनत घेतली.