व्यवस्थापकीय संचालक असीम कुमार सामंता
गुहागर : रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समुद्र किनारे स्वछता अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत आरजीपीपीएल कंपनी व ग्रामपंचायत वेळणेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने वेळणेश्वर समुद्रकिनारी स्वछता अभियान राबविण्यात आले.या स्वच्छता अभियान मोहिमेत कंपनीचे सर्व कर्मचारी, तहसीलदार कार्यालय गुहागर, पंचायत समिती आरोग्य विभाग, वेळणेश्वर ग्रामपंचायतचे सरपंच सर्व सदस्य, जिल्हा परिषद् शाळा, अंगणवाडी सेविका, तंटामुक्ती समितीचे सदस्य, ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी बोलताना आरजीपीपीएल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असीम कुमार सामंता म्हणाले की स्वछता ही ईश्वर सेवे सामान आहे. आपल्याला ७२० किलोमिटरचा लांबलचक आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे महासागर हा उपजिविकेसाठी मानवाला उपलब्ध असलेले एक प्रमुख साधन आहे. परंतु वाढते शहरीकरण, लोकसंख्येचा विस्फोट आणि प्लास्टिक कचऱ्यामुळे समुद्राची जैवविविधता धोक्यात आली आहे. याचा परिणाम पर्यवरणावर होत असून त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण, विविध आजारांना आपण आमंत्रण देत आहोत. यासाठी आपल्याला जैवविविधता जपली पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणजे समुद्र किनारे हे प्लास्टिक मुक्त केले पाहिजेत. तसेच स्वच्छ ठेवले पाहिजेत. कारण आज आढळून येणाऱ्या प्रदूषणामध्ये प्लास्टिक पासून होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे. समुद्र किनारे स्वच्छ आणि प्लास्टिक मुक्त झाल्यास समुद्रातील जैवविविधता वाढीस लागेल आणि त्यामुळे समुद्रावर आधारित मासेमारी, पर्यटन यासारखे विविध व्यवसाय वाढीस लागतील आणि आपणासाठी उपजीविकेचे साधन निर्माण होईल. प्रदुषण कमी होईल आणि विविध आजारांना रोखण्यासाठी मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
आज आपण करीत असलेली स्वछता ही आपल्या बरोबरच आपल्या भावी पिढीसाठी असून आपण याद्वारे त्याचे भविष्य उज्वल करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यांना स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त हवेत श्वास घेता यावा यासाठी आपण आज केलेली हि गुंतवणूक आहे. अभियानासाठी महिलांची असलेली उपस्थिती पाहून श्री. सामंता यांनी कौतुक केले.स्वच्छतेसाठि महिलांनी मोठ्या प्रमाणावर घेतलेला सहभाग हा आपल्या अभियानाला मिळालेले मोठे यश आहे. कारण प्रत्येक महिला ही तिच्या कुटुंबाचा महत्वाचा घटक असते आणि तिने घेतलेला पुढाकार हा एका कुटुंबाचा पुढाकार असतो. अशाच प्रकारे आपल्याला एक एक कुटुंब, एकएक गाव, एक तालुका, एकएक जिल्हा, एकएक राज्य या अभियनात जोडुन देश स्वच्छ, सुंदर व प्रदुषण मुक्त बनवून देशाच्या उन्नतीला आणि प्रगतीला हातभार लावूया, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी आरजीपीपीएल कंपनीचे ए.जी.एम. सुरेश कुरुप, श्री. थॉमस, आरजीपीपीएलचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. वाय पी. इंजे, एच. आर. प्रमुख डॉ. जॉन फिलिप, सर्व विभागांचे प्रमुख व कर्मचारी, तहसीलदार सौ लता धोत्रे, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा परिषद सदस्य सौ नेत्रा ठाकूर, ग्रामपंचायत वेळणेश्वरचे सरपंच चैतन्य धोपावकर, उपसरपंच अमोल जामसुतकर, माजी सरपंच नवनीत ठाकूर, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.