पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांचे प्रतिपादन
गुहागर : छत्रपती हे नाव ज्यांनी संपुर्ण जगावर अजरामर केले अश्या थोर शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकाच्या नसानसात असले पाहिजेत. शिवाजी महाराजांनी चालवलेले प्रशासन आजच्या युगातही अंमलात आले पाहिजे असे प्रतिपादन गुहागरचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी केले.
तळवली डावलवाडी येथे आयोजित शिवजयंती कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, देशाच्या राष्ट्र पुरुषांना अभिवादन केले गेलेच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेले संघटन सर्वांनी आत्मसात केले पाहिजे. शिवरायांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणणे ही आजच्या काळाची गरज आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही मर्यादा असल्याने त्याचे पालन करून अश्या राष्ट्र पुरुषांना अभिवादन करणे गरजेचे आहे. शिवाजी महाराजांचे कार्य एवढे मोठे आहे की लहानथोरांना त्यांच्या कार्याची परिपूर्ण माहिती आहे.असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी गुहागर पोलीस स्थानकाचे पोलीस राजू कांबळे, गुप्तचर पोलीस संतोष साळसकर, अमोद गोळे, तळवली सरपंच मयुरी शिगवण,उपसरपंच अनंत डावल, ग्रा.पं. सदस्य संतोष जोशी,सचिन कळंबाटे, माजी सरपंच यशोदा सांगळे, उपसरपंच राकेश पवार, डावलवाडी अध्यक्ष प्रदीप चव्हाण, पोलीस पाटील विनोद पवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष उत्तम पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल जड्याळ यांनी केले.