गुहागर तालुका नमन संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
गुहागर : शिमगा उत्सवात नमन खेळांच्या माध्यमातून गाव भोवनी व धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी शासनाची परवानगी मिळावी, अशी मागणी गुहागर तालुका नमन संघटनेच्या वतीने गुहागर तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गुहागर तालुक्यात शिमगा उत्सव अत्यंत श्रध्देने व शांततापूर्ण धार्मिक वातावरणात साजरा केला जातो. नोकरी व्यवसायानिमित्त परगावी वास्तव्यास असलेले गावकरी पालखी शिमगा सणासाठी ग्रामदेवतेच्या उत्सवात श्रध्देने सहभागी होतात. यात प्रामुख्याने पालखी तसेच खेळे घरोघरी आणले जातात. त्याची मनोभावे पूजा केली जाते. खेळ्यांमध्ये असणारा संकासुर व भक्तीचे प्रतीक असलेली राधा सर्वांच्या श्रध्देचा भाग आहे. नमन खेळे घरी आल्यावर बोललेल्या नवसाची पूर्तता श्रध्देने केली जाते. नमन खेळांच्या माध्यमातून धार्मिक वातावरणात सांस्कृतिक, पारंपारिक, प्रबोधनात्मक कलाही जोपासली जाते. शासनाने धार्मिक कार्यक्रमना परवानगी दिली आहे. घरोघरी येणारे खेळे हाही एक परंपरेने चालत आलेला ग्रामदेवतेचा धार्मिक कार्यक्रम आहे. शासनाने निर्देश केल्याप्रमाणे कोरोना संदर्भातील सर्व अटींचे पालन केले जाईल व नमनाच्या माध्यमातून कोरोनाच्या संदर्भात जनजागृती करून समाजाचे प्रबोधन ही केले जाईल. तरी नमन व खेळे हा ग्रामदेवतेच्या उत्सवातील धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे गाव भोवनीसाठी व धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी परवानगी मिळावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, अमरदीप परचुरे, जगन्नाथ शिंदे, नारायण रांजणे, सुधीर ताणकर, प्रमोद घुमे, अरुण भुवड, गजानन धावडे, अमित काताळे, राजू राऊत, अर्जुन भुवड आदिसंह सर्व नमन मंडळातील कलाकार उपस्थित होते.