गुहागर, ता. 18 : शहराचे महाजन म्हणून ओळख असलेले जनार्दन रामचंद्र कांबळे यांचे 75 व्या वर्षी निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
जनार्दन कांबळे हे जिल्हा परिषद शिक्षण विभागातून प्राथमिक शिक्षण म्हणून निवृत्त झाले. गुहागर तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कांबळे गुरुजी ज.रा.कांबळे म्हणून परिचित होते. गुहागरचे ग्रामदैवत श्री व्याघ्रांबरी देवस्थानेच अध्यक्ष या नात्याने ते गुहागर शहराचे महाजन होते. तसेच सन्मित्र मंडळ शिवाजी चौक या संस्थेचे आधारस्तंभ होते. ज. रा. कांबळेंनी उमेदीच्या काळात पत्रकारीताही केली होती. गुहागरमध्ये 40 वर्षांपूर्वी तालुका प्रेस क्लब नावाची संघटना होती. या संघटनेचे त्यांनी काम पाहिले. ज्येष्ठ नागरिक संघ, कोकण मराठी साहित्य परिषद यांचे तालुकाध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. गेले काही दिवस ते आजारी असल्याने चिपळूणमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रविवारी (ता. 17) सायंकाळी रुग्णालयातून त्यांना घरी आणण्यात आले. रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी सकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्या गुहागरमधील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.